हव्यास
कधी वाटतं खूप लिहावं
तावातावाने पेनही येतं हातात
टोपण उघडून श्रीगणेशा करणार
इतक्यात कानावर पडतात तीन शब्द
'अहो ऐकलंत का'
पेनाचं उघडू आलेलं टोपण लगबगीने बंद होतं
आणि मी उद्गारतो ' हो हो हा इथेच आहे ना'
प्रेयसीला दुखावणं किती हदयद्रावक असतं हे त्या पेनाला आणि वहीलाच कळतं.
शब्दघोट गळ्यात अडखळतात
पण मी तत्परतेनं आवाजाकडे जातो.
स्वयंपाकाला काय करू?
काव्याच्या नादात विश्वाला गवसणी घालू पाहणारं माझं चित्त धाडकन आदळतं गॅसच्या ओट्यावर, पण तो वेढा सुटलेला नसतो.
नकळतच माझं उत्तर जातं 'खिचडी करून टाक'
झणझणीत उत्तर ऐकायला मिळेल ह्या अपेक्षेने बघणारी घरधनीण मिळमिळीत चेहरा करून एक वक्रदृष्टी टाकते अन् समजून जाते 'ह्याचं ध्यान कुठे और ठिकाणी लागलं आहे'
कांहीं न बोलता ती अंतर्धान झाल्यासारखी निघून जाते समोरून, मी मात्र सुन्न होऊन कधी कागदाकडे तर कधी पेनाकडे बघत असतो असहायतेने. वहीशी प्रणय करायला आसुसलेलं इवलसं ते पेन अधाशासारखं बघत असतं माझ्याकडे, माझ्या निर्विकारपणाकडे!
कांहीं लिहिणं सुचणार नाही हे कळत असतानाही मी मात्र पेनाचं टोपण उघडतो आणि काही शब्द वहीवर उमटवतो. मनातला मी त्यावेळी दुःख विसरून अचानक सुखावतो कारण मी वही आणि पेनाचं पुनर्मिलन घडवून आणलेलं असतं.
विचारांच्या गर्तेतून उभारी घेतलेला माझा फिनिक्स पक्षी पुन्हा भरारी घेतो कल्पनेच्या उंच नभात आणि नकळत का होईना पुन्हा कविता स्फुरत जाते..... पुन्हा कविता स्फुरत जाते.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home