Monday, 6 March 2023

होळी तशी आणि अशी

मित्रांनो, आज होलिका दहन! सामान्य शब्दात आपण होळी म्हणून संबोधतो तो सण. सण ह्या अर्थाने की होळी येईपर्यंत शेतकरी आपल्या शेतातील रब्बी पीकाची बेगमी करून आनंद साजरा करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन तयार असतो. वातावरण वसंताची चाहूल घेऊन सगळ्यांच्या चित्त वृत्तींना फुलवित असते आणि निसर्ग निरनिराळ्या रंगाची उधळण करीत आपला हर्ष व्यक्त करीत असतो. आख्यायिकेनुसार भक्त प्रल्हादाला शिक्षा करण्याचा उद्देश घेऊन त्याची आत्या होलिका ही त्याला घेऊन अग्निमध्ये दहन करण्याची मनीषा घेऊन एका चितेवर विराजमान झालेली असते. तिला अग्नि स्वाहा करु शकणार नाही असे वरदान प्राप्त असते. पण जगत् पालनकर्ता साक्षात भगवान विष्णु जेथे रक्षक बनून आपल्या निरागस भक्ताचे रक्षण करण्यासाठी उपस्थित असेल तेथे इतर शक्ती निष्प्रभ ठरणारच. आणि त्या अनुसार जेव्हा चिता पेटविल्या जाते तेव्हा भक्त प्रल्हादाला कोणतीही इजा न होता तो सुखरूप राहतो परंतु दुष्ट प्रवृत्तीची त्याची आत्या 'होलिका' मात्र राख होऊन जाते. तात्पर्य असे की होळी पेटविताना आपणही आपल्या मनातील सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रवृत्त व्हावे आणि त्या अग्नि साक्षीने पुन्हा मन निर्मळ करून पुढील जीवन यापन करावे. मनातील दुष्टता समूळ नाश व्हावी यासाठी मोकळ्या मनाने शिव्या देणं हा देखील त्या दिवशी चा उपचार मानला गेला आहे. ती कृती जरी तद्दर्शनी विकृत भासत असली तरी तो मानसोपचाराचा एक प्रकार म्हणून परंपरेत सामावला गेला आहे. 
स्वातंत्र्य पूर्व काळात जुलमी इंग्रजांविरुद्ध बोलण्याची हिंमत सहसा दाखविणे शक्य नव्हते तेव्हा " होळी रे होळी पुरणाची पोळी आणि साहेबाच्या ××वर बंदुकीची गोळी" अशी जोरात हळी दिली जात असे आणि त्या द्वारे इंग्रजी हुकूमशाही विरुद्ध आपला राग शमविण्याचा जो तो आपल्या परीने प्रयत्न करीत असे. असो! वर्तमानात होळीविषयीच्या संकल्पना बऱ्याच अंशी बदलल्या आहेत ह्या मागे वाढतं शहरीकरण, सर्वत्र फोफावलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा, त्या शाळांवरील कन्व्हर्टेड पाद्ऱ्यांचे अलिखित प्रभुत्व आणि ते उसने अवसान आणून विचित्र हावभाव करीत उच्चारले जाणारे इंग्रजी शब्द संवाद आहेत. इंग्रजी भाषा इतकी दरिद्री आहे की त्या भाषेत अस्सल गावरान मराठी मधील एकाही शिवीला पर्याय वाची शब्द अस्तित्वात नाही. एखाद्या कन्व्हर्ट झालेल्या पाद्र्याला राग अनावर झाला की मग आपसूकच त्याचे तोंडी हा तिखट मेवा प्रवाहित झाल्याचे दिसून येते. भारतीय परंपरा मधील हा अनोखा उपक्रम मात्र आजही आमच्या गाव खेड्यांनी घट्ट कवटाळून ठेवलेला आहे. तसे पाहता शिवीचा वापर त्यांना दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग असतो. परंतु तरीही होळीच्या दिवशी अत्यंत उजागरीने ही पर्वणी साधता येते ह्याचं आकर्षण त्यांचं भान हरवून टाकते. शहरांमधील होळीचं रूप बऱ्यापैकी इंग्रजाळलेले आहे. जवळपास सगळं काही सांकेतिक स्वरुपाचे! न्यक्लियर कां काय म्हणतात ते कुटुंब हलकेच होळीच्या स्थानावर येते, एका पिशवीत भरून आणलेल्या दोन मिनि साईज गोवऱ्या हळूच बाहेर काढते. होळीत आहुती दिल्या जाणार आहोत ह्याचे भान असलेल्या त्या गोवऱ्यांना देखील त्यांचं ते संवेदनशील, हळूवार पण गदगद करून जाते. त्यानंतर स्विग्गी, झोमॅटो किंवा अशाच एखाद्या खाद्य आपूर्ति संस्थेतर्फे पुरवल्या गेलेल्या चूर्ण रूपी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आपला लेंगा सावरत सावरत ती मायडम पांच थेंब बिसलेरी चं पाणी हातात घेऊन इकडे तिकडे उडविते. तिचा नमस्कार घेताना त्या होळीच्या मनात तिचा 'हाय बाय' स्विकारल्याचा भाव आपसूकच तरळून जातो. स्वातंत्र्य प्राप्तीच्या आसपास अवतरलेले द्विपाद जीव ह्या सगळ्या हालचाली मंदावलेल्या नजरांनी मात्र निरखून बघत राहतात आणि मनातल्या मनात आपली भडास मोकळी करून घेतात. एक मात्र खरे की निरनिराळ्या प्रकारच्या होळी स्पेशल आभूषणांनी नटलेल्या त्या होळीला त्यावेळी थोड्याच वेळात आपलं सर्वस्व राखरांगोळी होणार हे निश्चित विसरायला होत असेल खचितच. उपस्थित स्त्री समुदायाच्या आपापल्या अंतरंगात उसळणाऱ्या हेव्यादाव्यांचं आदान प्रदान संपेस्तोवर होलिका दहन पूर्णत्वास पोहचलेले असते आणि ते बघून उसासा सोडत त्या स्त्रियांचे आपापले भाबडे कुंकू इशारा होताच बुग्गु बुग्गु करीत गपगुमान आपापल्या गाळ्यात घुसतं.
तर मित्रहो, ही किंवा थोड्या फार फरकाने हे असेच दृश्य तुम्ही सारे निश्चितच अनुभव करीत असता, होय ना? 
जाऊ द्या, कांहीं का असेना, होळीचा सण साजरा करण्यासाठी सकारात्मकता अजून जिवंत आहे ह्याचा आनंद मानुया आणि खूप धुळवड करुयात.
खूप खूप शुभेच्छा!!
कवि 'रवि'





0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home