मराठी भाषा दिवस आणि आपण
मित्रांनो जय श्रीराम,
तसं पाहिलं तर आपण सगळी मराठी माणसं खूप पुरोगामी आणि झटकन स्वतःला प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये स्वाभाविक दृष्ट्या सक्षम आहोत. हा आपला गुण आपल्या इतका अंगवळणी पडला की नकळत कां होईना, पण आपण आपल्या माय मराठी वर इतर भाषांमधील शब्दांना अतिक्रमण करवून देत आहोत हे ही लक्षात येऊ नये अशी आपली अवस्था झाली. थोडं परिक्षण कराल तर माझं मत निर्विवाद आहे हे तुम्हाला जाणवेल.
आज मराठी भाषा दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून चला आपण आपल्या मनाशी एक गाठ बांधुया की आपल्यात संवाद साधताना आपण शत प्रतिशत मराठी शब्दांचा वापर करून आपली भाषाशुद्धी करुयात आणि शतकांपासून समृद्ध असलेली आपली मायबोली अंगवळणी पडावी यासाठी सामुहिक रित्या पराकाष्ठा करुयात.
संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात
" माझा मराठाची बोलु कवतिके,
अमृता तेही पैजा जिंके"
मला खात्री आहे आपल्या मधील प्रत्येकाच्या मनात मायबोली विषयी आदर, प्रेम, जिव्हाळा सगळं काही आहे, फक्त कालौघात आपण थोडं दुर्लक्ष करीत गेलो.
चला तर मग आज निश्चय करून मार्ग क्रमण करुयात.
( मराठी भाषेची सर्व रूपे मला अपेक्षित आहेत.)
कवि 'रवि'
