परंपरेतील गुढीपाडवा आणि आजचे आपण
जय श्रीराम!
होय आजच्या जय श्रीराम च्या उच्चारणाला विशेष महत्त्व आहे कारण, आजच्या रोजी प्रभू श्रीरामाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. जगातील अनेक ठिकाणी ह्या उत्सवाला अनन्य महत्व आहे. आणि, त्या त्या ठिकाणी जनमन श्रीराममय होऊन श्रीराम चरित्र वाचन-चिंतन-मनन आणि त्यानुसार वर्तन ह्यात रमून मंत्रमुग्ध होऊन जाते.
मित्रांनो ही झाली नवरात्रोत्सवाच्या काळात बघायला मिळालेली एक घटना. पण ह्या उत्सवाच्या दृश्य परिणामा पेक्षाही अधिक परिणाम आंतरिक स्थितीवर झाल्याचे अनुभवास येते. ' मन रामरंगी रंगले ' ह्या ओळी तून चित्त आणि वृत्तीचं अमोघ वर्णन व्यक्त झालेलं आहे. भारतीय परंपरा अशा उत्सवांनी इतक्या सहजपणे नटलेली आहे की पारमार्थिक जीवन आमच्या नसानसात आणि श्वासातही भिनलेलं आहे. त्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा सोहळा म्हणजे सुवर्ण पंचामृत योगच म्हणावा लागेल.
अनादि काळापासून श्रीरामाच्या चरित्राने सनातनी जनमानसावर इतका घट्ट प्रभाव काय म्हणून राखला असावा!? प्रश्न साधा सोपा पण विचारांना गहनतेकडे नेणारा अवश्य आहे. निरिच्छ प्रवृत्तीने राजाचं जीवन कसे जगावे ह्याचा हा परिपाठ आहे आणि त्या अर्थाने प्रत्येक प्रापंचिक व्यक्तीला ते ग्राह्य आहे. अलिकडच्या काळातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू श्रीरामाचे निस्सिम भक्त, समर्थ रामदास स्वामींच्या सहवासातून हे मर्म समजून घेण्यात यशस्वी झाले आणि, हिंदू हृदयावर अधिराज्य स्थापित करते झाले.
सुमारे तीनशे पन्नास वर्षांच्या कालावधीत, परप्रांतीयांच्या आक्रमणाचा यशस्वी निःपात करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहू शकला, तो प्रभू श्रीराम आणि तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास करून.
स्वातंत्र्यापश्चात काही दशके भारतीय जनमानसावर प्रभाव ठेवून असलेल्या गांधी-नेहरू ह्यांचा समाजविघातक चेहरा आता बऱ्याच अंशी उघडा पडलेला आहे आणि सार्वकालीक श्रीराम-शिवरायांची चरित्रे पुन्हा एकदा अनुकरणीय ठरत आहेत ही आधुनिक भारताची सुरुवात आहे.
गुढीपाडवा हा सनातनी नववर्षाचा आद्य दिवस आहे आणि तो परंपरेनुसार साजरा केला जातो. त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम व छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
वसंत ऋतूतील विहंगम वातावरण आपल्या सर्वांच्या हृदयात राष्ट्राभिमान आणि धर्म प्रेम वृध्दिंगत करो ही सदिच्छा!
वर्ष प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, उगादि, बिहु, गुढीपाडवा अशा अनेक नामाभिधानांनी नटलेल्या ह्या दिवशी आपण सगळे एकमेकांना अभिष्टचिंतन करुयात.
अनेकानेक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार!
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home