Tuesday, 19 October 2021

एक दृष्टांत

अनुभवाविण सारेच लटके. एकदा एक अतिउत्साही माणूस गारुड्याकडे गेला आणि त्याला १०० रुपये देऊन म्हणाला मला साप पकडायला शिकव. गारुडी म्हणाला त्यासाठी जंगलात चला. त्यावर तो म्हणाला मी ज्ञानी आहे तू मला येथेच काय ते सांग मी समजून घेईन आणि प्रसंगी उपयोगात आणीन. गारुड्याने त्याला यथाशक्य सगळे समजावून सांगितले. तो मनुष्य आनंदाने घरी परतला आणि दररोज मनातच कल्पनेने साप धरू लागला, कांहीं काळानंतर असा प्रसंग उद्भवला की त्याला जंगलात शिरावे लागले आणि उशीर झाल्यामुळे एका झाडाखाली मुक्काम करावा लागला. श्रमामुळे त्याला गाढ झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा बघतो तर काय त्याच्या शेजारी एक नाग फणा काढून स्वस्थ बसलेला आणि त्याच्या कडेच दृष्टी ठेवून आहे. तो ज्ञानी मनुष्य शीघ्रतेने गारुड्याची शिकवण आठवू लागला. गारुड्याचे शब्द त्याला स्पष्ट आठवत होते पण हातपाय काही वळायला तयार नव्हते. त्याची तारांबळ बघून शेवटी त्या नागानेच त्याला अभय दिले आणि बोलता झाला "हे ज्ञानी माणसा, घाबरू नकोस! तुला दीर्घ निद्रेत बघून मी तुझे रक्षण व्हावे यासाठी तुझ्या शेजारी बसून आहे'. नागराजाचं हे असं अकल्पनीय वर्तन बघून त्याला आपल्या नसलेल्या ज्ञानाचा वृथा अभिमान बाळगल्या बद्दल घृणा वाटली आणि तो नागाची माफी मागत म्हणाला 'हे नागराज आपण माझ्या प्रती जी मित्रता दाखविली आहे ती प्रशंसनीय तर आहेच पण माझ्या सारासार विचार करण्याच्या दृष्टीला देखील जागृत करणारी आहे. आज मला स्वानुभवातून हे निश्चित कळले आहे की कुणी कुणाचा कायम शत्रू असू शकत नाही तर परीस्थिती नुरूप प्रत्येकाची प्रतिक्रिया असते. असो! ह्या पुढे मी कुणाही विषयी मनात किल्मिष बाळगणार नाही.
कवि'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home