Sunday, 5 September 2021

पोळा कृषक आणि परंपरा

श्रावण महिन्यातील अखेरच्या दिवशी अर्थात श्रावणी अमावस्येला महाराष्ट्र आणि दक्षिण प्रांतात पोळा ह्या सणाची व्याप्ती दिसून येते.कृषी संबंधित सगळी कामं बहुधा बैलांच्या साहाय्याने केली जातात म्हणजेच अन्नधान्य उत्पादनात शेतकऱ्यांची खरी सहायता हे कामसू मूक जीव शरीर झिजवून करतात. मातीतून मोती पिकावा म्हणून आणि मानव जातिचे पोषण व्हावे यासाठी हा मातीतील मोती, पाणी व प्राणवायू इतकाच महत्वाचा आहे. 
कांहीं दशकांपूर्वी पर्यंत एखाद्या परिवाराची आर्थिक परिस्थिती आकलन करावयाची असेल तर त्यांच्या गोठ्यात किती बैलजोड्या आहेत हे बघितले जात असे. यांत्रिकीकरण वाढलं आणि समृद्धी च्या व्याख्या बदलल्या. खरं पाहता आपण शाश्वत समृद्धी पासून भ्रामक समृद्धी कडे मार्गस्थ झालो आणि अनेक चीर स्थायी उपलब्धींना मुकलो आहोत. समाजाची घडी उध्वस्त होईल इतपत ह्या यांत्रिकीकरणाचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडला आहे, परिणामी आपण वैयक्तिक स्वास्थ्यासोबत सामाजिक स्वास्थ्य देखील बिघडवून बसलो आहोत.
वाढतं शहरीकरण आणि त्याच्या आकर्षणापायी कित्येक परिवार नष्ट झालेत हे सत्य आपण अभ्यासत नाही हा दैवदुर्विलास आहे. सहस्त्रकांच्या जडणघडणीतून जी व्यवस्था मजबूत झाली आहे तिला काही दशकांमध्ये आपण सुरूंग लावला आहे. ह्याच्या दुष्परिणामांचं ज्वलंत उदाहरण म्हणून पश्चिमी देशांकडे बघता येईल. आपणही त्याच दिशेने जात आहोत हे कुणा द्रष्ट्याला अजून पर्यंत जाणवलेलं नाही हे आश्चर्य म्हणावं की आभासी जगाची भुरळ पडली म्हणावं? 
पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी खाताना किमान त्या उपकार कर्त्या जीवांची सहानुभूती पूर्वक आठवण प्रत्येकाने करावी. क्षण दोन क्षण आपल्या परंपरा विषयी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून चर्चा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे.
सनातन धर्म आणि त्याची ध्वजा आपल्या स्थापित रीतिरिवाजांसह अबाधित राहो हीच कामना.
पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा.
रविंद्र सरदेशमुख (कवि 'रवि')

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home