Saturday, 24 September 2022

प्रकृती स्वभाव

जय श्रीराम, नम्रता आदर किंवा प्रेम भावना ही सगळी काही मनुष्य जातीची मक्तेदारी नाही तर सृष्टी कर्त्याने निर्मिलेल्या प्रत्येक सापेक्ष अस्तित्वात ती आहे. धरणी कधी आपलं फिरणं थांबवत नाही, सूर्य नियमाने उगवतोच, चंद्र तारे योग्य समयी नभ व्यापतातच. ह्या प्रत्येक क्रियेत नम्रता आदर आणि प्रेम भावना स्पष्टपणे अनुभवता येते. ह्या शाश्वततेकडे माणूस कितीसा डोळसपणे बघतो हे अस्पष्ट आहे. जीव जीवाची हत्या करतात ती निसर्ग नियमानुसार, परंतु माणूस मात्र वृथा अहंकार, असूया, द्वेष, लोभ, मोह आणि केंव्हा केंव्हा तर अकारण सुद्धा सर्वनाश घडवून आणतो. आणि म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने तुम्हाला सामोरी जाते, आदर व्यक्त करण्यासाठी दोन्ही हात जोडून नमस्कार उच्चारते तेंव्हा समजून जावे की त्या परमात्म्याला अभिप्रेत असलेला मानवी अंश आपल्यात किंचित पणाने कां होईना पण उतरला आहे. आणि आपण त्याचं जे काही देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी कृतीशील आहोत. "सर्वे भवन्तु सुखीन:, सर्वे संतु निरामय:, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:खभाग्भवेत". 🙏

Thursday, 22 September 2022

अध्यात्म!!!

जय श्रीराम मित्रांनो, विषय अध्यात्माचा निघाल्यावर "अध्यात्म" ह्या शब्दाचा संधी विग्रह करणं क्रमप्राप्त ठरते. तो असा 'अध्य+आत्म'. अर्थात आत्म्याचे अध्ययन. मग प्रश्न असा निर्माण होतो की आत्मा म्हणजे काय? मनुष्य जीवाला ज्ञात असलेल्या विज्ञानामध्ये आत्म्याला रंग रूप ऐहिक अस्तित्व असं नाही परंतु पारलौकिक अस्तित्व मात्र आहे. म्हणजेच काय तर विश्व व्यापून उरलेल्या ब्रम्हांडनायकाचाच एक अंश तो आत्मा आहे. म्हणजेच जे काही शरीरधर्म संपादन करू शकत नाही ते आत्म्याला शक्य आहे आणि त्यानं अर्जित केलेल्या बुद्धी रूपी फळाचं समर्पण थेट परमात्म्याला प्राप्त होते. ही जी अद्वैताची अनुभूती पंचेंद्रीय अनुभवतात त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं असा शब्दप्रयोग आहे. थोडक्यात काय तर ताकाला जाऊन भांडं न लपवता थेट परमात्म्याला शरण जाऊन त्याचं नामस्मरण अविरत करीत रहावे आणि अहंकार नष्ट करावा. येथे अहंकार म्हणजे गर्व असा अर्थ अभिप्रेत नसून अहंकार म्हणजे स्वतःच्या भौतिक अस्तित्वा पासून परावृत्त होणे असा आहे. स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन शब्दांची व्याख्या मनाला पटवून दिली की परमावस्थेला पोचणं सहज साध्य होते. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम 🥹🥹 सुंदर सकाळच्या सर्वांना शुभेच्छा 🙏