सामाजिक समरसता:- व्याख्या आणि प्रवास
मित्रांनो,
अनादि काळापासून सनातन संस्कृती अस्तित्वात आहे आणि तिच्या शाश्वततेच्या स्वभावगत लक्षणामुळे ती अनंत काळापर्यंत अबाधित राहील यात शंका नाही.
आता आपण "सामाजिक समरसता" ह्या विशेषण युक्त विषयाची नेमकी व्याख्या काय ह्याचा विचार करुयात.
ह्या विषयावर काही लिखाण सुरू करण्यापूर्वीच मी वर सनातन संस्कृती चा उल्लेख केला तो कां हे आपल्या लक्षात येईल.
मित्रांनो सनातन संस्कृती च्या सामाजिक रचनेप्रमाणे ती व्यवसायाभिमुख आणि विनिमय पद्धतीने प्रचलन करणारी होती. जो पर्यंत हा विनिमय वस्तूंच्या आदानप्रदानावर आधारित होता तो पर्यंत वर्णव्यवस्था कायम होती आणि जाति व्यवस्थेचा उगम झालेला नव्हता. म्हणजेच काय तर जो तो आपापल्या व्यवसायात रममाण होता आणि त्याचे समन्वयन देखील उत्तम रीतीने अस्तित्वात होते.
मित्रांनो ह्या व्यवस्थेचा मूळ उद्देशच असा होता की समाजातील प्रत्येक घटकाला एकमेकाची गरज असावी आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारची स्पर्धा निर्माण न होता समाज जीवन सुचारू रहावे. आणि ह्या वर्तनाला आजच्या भाषेत आपण सामाजिक समरसता असे संबोधले आहे.
"उच्च नीचतेचा नि:पात आणि व्यवसायाभिमुख समाज जीवन" हीच सामाजिक समरसतेची व्याख्या ठरू शकते.
मग ही आदर्श व्यवस्था कां म्हणून लयास गेली?
त्याचा उहापोह आपण यापुढे करणार आहोत.
सनातन भारताचा व्याप हा जवळपास संपूर्ण आशिया खंडात पसरलेला होता आणि त्या अनुषंगाने मोठा व्यापार देखील होत होता. समृद्ध जीवन असल्याने दैनंदिन गरजां पलिकडे जाऊन आवड निवड आणि त्या अनुषंगाने विविध वस्तूंची खरेदी तसेच विक्री प्रांता प्रांतात सुरू झाली आणि येथपासून विनिमय पद्धती मध्ये बदल घडून येण्याची निकड निर्माण झाली.
लक्षात घेण्यासारखे आहे की त्या काळी मौल्यवान वस्तू जसे की सोनं चांदी तांबे आणि विविध रत्ने ही विनिमया करिता पर्याय म्हणून उपयोगात आली.
या प्रकारच्या व्यवहारात अडचण अशी होती की जो तो आपापल्या परीने वस्तूंचे मूल्य निर्धारण करू लागला आणि त्यामुळे व्यवहार एक अर्थी अनियमिततेच्या विळख्यात सापडले जात.
पर्यायी व्यवस्था म्हणून पुढील काळात सुवर्ण मुद्रा, चांदीच्या मुद्रा आणि तांब्याच्या मुद्रा चलन म्हणून अस्तित्वात आले आणि व्यापार व्यवस्थापन नियमित झाले तसेच त्यामुळे व्यापार उदीम भरभराटीला लागला आणि समाज व्यवस्था देखील प्रभावित झाली. हळूहळू प्रांता नुसार चलनी नाणी घडविल्या जावून विविध देश प्रदेश आपल्या प्रांतात निर्मित वस्तूंचे मूल्य निर्धारण स्वतः करू लागली, आणि त्या अनुषंगाने एक प्रकारची स्पर्धा तसेच वर्चस्व निर्माण करण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली.
सहस्त्रावधी वर्षांची व्यवस्था ह्या विनिमय क्रांतीने लोप पावली आणि व्यापारी वृत्तीला प्रचंड बळ प्राप्त झाले. ह्या मुळे समाजव्यवस्था सुद्धा मोडकळीस आली आणि जागोजागी नवश्रीमंत उदयास आले, त्यांनी आपल्या श्रीमंतीच्या जोरावर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले, त्यातून स्पृश्य अस्पृश्य असा भेदाभेद जन्माला आला. ही विषवल्ली इतकी फोफावली की शतकांच्या प्रयत्नांनंतर ही ती आजही आमच्या अवतीभवती अस्तित्वात आहे, व प्रखरतेने त्याचा प्रभाव निदर्शनास येतो.
मित्रहो, छत्रपती शिवरायांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे सर्व प्रथम ह्या स्पृश्यास्पृश्यतेला आळा घालण्यासाठी सुरुवात झाली.
छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा इतिहास अभ्यासताना हे प्रकर्षाने जाणवते की त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय आणि प्रबोधन करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांचा हा वारसा पुढे महाराष्ट्रातील प्रबुद्ध जनांनी निरनिराळ्या प्रकारे केवळ जपलाच नाही तर त्याला अर्थात सामाजिक समरसतेला मूर्त स्वरूपात मान्यता प्राप्त व्हावी यासाठी वेळोवेळी आंदोलने देखील केलीत.
पारतंत्र्याच्या साधारण सहाशे वर्षांच्या कालावधीत अशा अनेक संत महात्म्यांना किंवा समाज सुधारकांना स्वार्थांध शक्तिंनी पुरजोर विरोध केला. प्रसंगी त्यांच्या हत्या देखील घडवून आणल्या आहेत. शासनकर्ती जमात त्यांच्या प्रांतातील लोकांना आपल्या अधीन राखण्यासाठी वैध अवैध सर्व प्रकारच्या कृतींचा अवलंब करीत होती. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयोग अंमलात आणले जात होते.
त्यातूनच जाती जातीं चं विषारी राजकारण जोर धरू लागलं.
आजपावेतो आपण जातिभेद, धर्मभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढतो आहोत हीच खरी विभीषिका (भयंकर बाब)आहे.
मित्रांनो, आज काळ बदलला आहे, जगभरातील समाजव्यवस्था एका नवीन रचनेचा अनुभव करीत आहे ज्यात जातिभेद किंवा वर्णभेद लयास जाऊन एक नवीनच समाज व्यवस्था उदयास येत आहे. केवळ पाश्चिमात्य देशांमधूनच नाही तर भारतीय उपखंडात देखील ह्याची प्रचिती येत आहे.
परंतु असे असूनही आपल्या सभोवती आपण सामाजिक विषमता आहे हे अमान्य करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
अशा ह्या वातावरणात "सामाजिक समरसता" हा विषय घेऊन त्यावर समाजाच्या सर्व स्तरात मोठ्या प्रमाणात विचार मंथन आणि त्या अनुषंगाने सकारात्मक बदल घडून येणे अत्यावश्यक आहे.
"वसुधैव कुटुंबकम्" ही आपली प्राचीन संकल्पना पुन्हा पुनरुज्जीवित होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने एक समान जीवन पद्धती आत्मसात करणे ठरेल. आणि यातूनच अवघे विश्व पुन्हा एकदा सामाजिक समरसतेला अनुभूत असे विलक्षण जीवन जगण्यासाठी प्रवृत्त होईल.
रविंद्र सरदेशमुख.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home