Thursday, 23 October 2025

हं....शके १९४७ ची दिवाळी आज अधिकृतपणे संपन्न झाली असेलही परंतु दिवाळी फराळ मात्र आणखी काही दिवस पुरणार आहे, खरे आहे ना!?मित्रांनो ज्यांची मुलं-नातवंडं जवळ नाहीत ते फराळाचे डबे सांभाळून ठेवतात पण ज्यांची मुलं-नातवंडं जवळ आहेत ते ही डबे सांभाळून ठेवतात ह्या आशेने की कधीतरी त्यांना वेळ मिळेल आणि ते आजीला म्हणतील "आजी फराळाचं दे"!खरंय मित्रांनो, आजकाल सगळं आहे पण वेळ नाही. केलेला फराळ, आणलेले फटाके, नवनवीन कपडे, ठरवून ठेवलेल्या रांगोळ्या , रोषणाई च्या वस्तू इतकंच काय तर औक्षण-उटणे-सुगंधी तेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हां म्हाताऱ्यांकडे आ वासून बघत असतात आणि विचारतात "अरे कशासाठी केला होता अट्टाहास".प्रगतीच्या वाटांवर आपल्या पिढ्यांना ढकलतांना कां म्हणून आपण ह्याचं भान जपलं नाही? संस्कारांनी खरं तर कुठेही अतीरिक्त वेळ आपल्या कडून अपेक्षिला नव्हता पण तेव्हा आपणही नसत्या आधुनिक विचारांची तळी उचलून नवनवीन तर्क करीत होतो आणि आपणच ढासळवलेल्या बुरुजांच्या ढिगाऱ्यांवर बसून उसासे टाकत आहोत. असो!येणाऱ्या बाल्यावस्थेतील आपल्या वंशजांनी आपला धर्म -संस्कार-रूढी-परंपरा अबाधित ठेवाव्यात असं वाटत असेल तर उठा कोणताही संकोच-पूर्वग्रह किंवा किंतु परंतु मनात न बाळगता हिरीरीने पुढे होऊन त्यांना सगळं शिकवा, प्रसंगी आपल्या मुलांचा क्षोभ ही सहन करावा लागला तरी चालेल पण ही वेळ दवडली तर आपण धर्मद्रोही, समाज द्रोही ठरणार आहोत. दिवाळी च्या गोडगोड फराळाचा तसेच सततच्या शुभेच्छांचा वर्षाव सरला आहे, तेव्हा आता स्वप्न रंजन सोडून वास्तवाच्या कडू घोटाला सामोरे जाऊ आणि कृतिशील होऊ.जय श्रीराम!

दिवाळीचा उपसंहार 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home