मातृछाया
आई
चंदनाच्या सुवासाने दरवळणाऱ्या आसमंता प्रमाणे सुखमय तुझा सहवास. तुझ्या पदराच्या छायेत क्षणभर जरी विसावा मिळाला तरी असं वाटावं की रण रण तापलेल्या वाळवंटात वाट चुकलेल्या पांथस्थाला (मुसाफिराला) ओऍसिस मिळालंय. तुझा मायेने डोक्यावरुन फिरत असतानाचा हात म्हणजे जणू उघड्या पृथ्वीवर निराधार, निराश्रय जगणाऱ्या माणसाला मिळालेली आकाशाएवढी मायेची छायाच. सकाळची झोपेतून उठवितानाची हांक म्हणजे तर एखाद्या सुप्तावस्थेत असलेल्या माणसाला जागृत करण्या करिता प्रगट झालेली ईश्वरी शक्तीच. ती साद मला सांगून जातेय की बाळा उठ जागा हो आणि पृथ्वीवर घडत असलेल्या नित्य नवीन घटनांना डोळसपणाने बघ. त्यांचा 'खेळ' सदैव जागृत राहून अभ्यास कर, त्यांचा मागोवा घे आणि स्वसमृद्धीसाठी त्याचा उपयोग कर. एक क्षण जरी तू सुप्तावस्थेत व्यर्थ घालवलास तरी तो क्षण तुला मागे टाकून पुढे निघून जाईल. खरोखर अगाध अतर्क्य आहे तुझ्या कृतीतील मतितार्थ !
तुझ्या समीप असताना मात्र हा गोष्टीची किंमत कधीच कळू शकली नाही. त्यावेळी असं वाटायचं की तू उगाच त्रास घेतेय, पण आज कळतेय तुझ्या प्रत्येक कृतीमागील दूरदर्शितेची महत्वपूर्णता, कुंभाराने घडविलेल्या प्रत्येक घड्याला भाजून काढले की ते पुन्हा कधीच आपला आकार बदलत नाही पण तुझ्या हातून साचेबद्ध झालेला प्रत्येक मनुष्य, तावून सुलाखून निघालेला प्रत्येक पुत्र आपली विद्वता प्रगतीच्या मार्गाकडे पाहिजे तशी आणि पाहिजे त्यावेळी बदलू शकतो ह्यातच तुझ्या हातातील नैसर्गिक कौशल्य आणि अद्भुतता प्रत्ययास येते. तुझा विधाता तो ईश्वर असेलही पण माझा विधाता तूच आहेस. मला जन्म आणि जीवन दिलंय ते तू, शक्ती दिलीय ती तू.
बुद्धी आणि बुद्धीचा योग्य मार्गाने वापर करण्याची कला मिळालीय ती तुझ्याकडूनच आणि म्हणून सर्व दृष्टीने जडणघडण करून
साकारलेल्या या तुझ्या पुत्राकरीता विधाता रूपही तूच आहेस. कधी कधी तुझे ऐकले नाही म्हणून तू मारलेही असेल तरी आज त्याच अश्रुबिंदूंचे, हास्य आणि आनंदाच्या फवाऱ्यात रुपांतर होऊ शकलेय ते त्यावेळी तू दिलेल्या शिक्षेमुळेच! मी असे कधीच म्हणणार नाही की तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत उलट मी असे म्हणेन की तुला ज्याने ही जबाबदारी सोपवली होती त्याच्यावरच तुझे असंख्य उपकार आहेत. कारण तुझ्या करणीमुळेच त्या सृष्टी नियंत्याची सृष्टी, प्रगतीकडे मार्ग आक्रमीत आहे अन्यथा त्याच्या कर्तृत्वाचा संहार होण्यास क्षणकालाचाही समय लागणार नाही.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home