'आंबेडकर' एक चिंतन
श्री रामाच्या नवरात्रात आपण बॅरिस्टर भिमराव आंबेडकर यांच्या विषयी बोलण्याचं ठरवलं हा एक विलक्षण योगायोग आहे. आंबेडकरांचं राजकीय आणि सामाजिक जीवन ह्या बाबतीत बहुतांश वेळा चर्चा केली जाते परंतु त्यांचं तत्वचिंतन ह्या विषयावर शक्यतो कुणी बोलत नाही. आज मी त्यांच्या ह्या पैलूवर प्रकाश टाकणार आहे.
हे सर्व विदीत आहे की आंबेडकर यांचं प्राथमिक ध्येय हे हिंदुंमधील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समूहाला एकात्म मानवता वादी दृष्टीने समाजातील सर्व घटकांनी स्वीकारावं हेच होतं. आणि त्यासाठी त्यांनी जीवन भर लढा दिला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या ह्या तळमळीला तत्कालीन समाजधुरिणांनी अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ह्या प्रकाराने खचून न जाता त्यांनी ह्यावर नि:संशय असा तोडगा काढला की त्याला धर्ममार्तंडांकडे तोड नव्हती. त्यांनी आपल्या ज्ञातिबांधवांसभवेत भगवान गौतम बुद्धाचा धम्म अंगिकृत केला. मतितार्थ असा की हिंदुंना आपल्या धर्मातील एक अवतार म्हणून मान्य असलेल्या गौतम बुद्धाचे पाईक झाल्याने आपण मूळ समूहा पासून परावृत्त ही होणार नाही आणि कृतार्थ तेची भावना अस्पृश्यांच्या मनात स्वाभिमान जागवेल. ह्या कृतीतून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच त्यांना अपेक्षित होते.
७२ वर्षांचा कालावधी लोटला आहे आणि आपण त्यांच्या द्रष्टेपणाचं फलित देखील सकारात्मक बघतो आहोत. अस्पृश्य ते दलित आणि सद्यस्थितीत समाजातील इतर घटकांच्या खांद्याला खांदा लावून ही मंडळी राष्ट्र निर्मिती मध्ये सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे.
हे सगळं सकारात्मक घडत असताना मात्र काही मंडळी आंबेडकरांच्या मूळ हेतू पासून दूर जाताना बघायला मिळतात. उदाहरणार्थ ते स्वतः ला हिंदुंपासून विभक्त मानतात, एवढेच नाही तर हिंदुंच्या देवतांची, मान्यतांची अवहेलना करतात, तिरस्कार करतात. खेदाने म्हणावे लागते की ह्या स्वार्थी वृत्तीने अशी मंडळी प्रवाहापासून दूर जात आहेत जे आंबेडकरांना कदापि मान्य नाही. ही माणसं साधं जय श्रीराम सुद्धा म्हणणं पाप समजायला लागलीत.
शेवटी इतकेच सांगतो की ज्यांना राम समजला नाही त्यांना बुद्ध समजणार नाही आणि आंबेडकर देखील समजणार नाही. ह्या तीनही चरित्रांमधील एकसूत्रता लक्षात घेईल तो खरा प्रबुद्ध होईल अशी माझी ठाम धारणा आहे. श्रीराम प्रभूंनी दुष्ट प्रवृत्तींचं निर्दालन केलं, भगवान बुद्धाने अहिंसेच्या मार्गाने दुष्ट प्रवृत्ती नष्ट केल्यात आणि आंबेडकरांनी दुष्ट प्रथांचा ऱ्हास व्हावा यासाठी आयुष्याचा यज्ञ केला.
समाजोन्नती साठी त्यांनी दर्शविलेल्या दिशा मानव समाजाला उन्नती कारक ठरोत येवढं बोलून मी येथेच थांबतो.
जय श्रीराम
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home