देव देव्हारा आणि भक्ती
ह्या पृथ्वीवरील प्रत्येक मानव समूहाचा देव ह्या भावनेवर दृढ विश्वास आहे. मी ह्या ठिकाणी "देव" ही भावना असे म्हंटल्यावर काही जणांना त्या बद्दल आक्षेप घ्यावासा वाटेलही कदाचित. पण माझी सर्वांना विनंती आहे की माझं संपूर्ण कथन ऐकल्या शिवाय मत बनवू नये किंवा प्रदर्शित देखील करू नये. तर विषय असा की देव ही आम्हां मानव वंशियांची हजारो वर्षांपासूनची दृढ भावना आजपर्यंत अबाधित आहे. किंबहुना जसजशी सामाजिक स्थिती बदलू लागली आहे, तसतशी ही भावना आणखिनच बळकट होत चालली आहे. ह्या दृढ भावनेचं प्रकटीकरण आज आपण प्रत्येक धर्म_पंथ_समुदाय ह्यांच्या वर्तनातून बघतो आहोत. थोडक्यात काय तर देवावरील ह्या श्रद्धेशिवाय कुणाचंही जगणं सुसह्य नाही. असो!
देव्हारा ही संकल्पना केवळ हिंदु धर्मियांपुरतीच मर्यादित आहे कां? तर तसं अजिबात नाही आणि कुणाही हिंदु धर्मियाने तशा भ्रमात राहू नये. फरक इतकाच आहे की हिंदु धर्मीय आपापल्या घरी एका विशिष्ट स्थानी एक देवघर तयार करून त्यात आपल्या आराध्य दैवतांच्या प्रतिमा ठेवून नित्य नेमाने त्यांची पूजा अर्चा करतो. इतर पंथातील अनुयायी त्यांच्या त्यांच्या श्रद्धांनुरूप कुणी प्रतिमा, कुणी छायाचित्रे, कुणी थडगी तर कुणी दोन हातांच्या तळव्यात देव आहे असे मानून त्या त्या प्रतिकाशी एकरूप होऊन भक्ती करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक धर्म पंथाचे लोक सामुदायिक प्रार्थना स्थळे बांधून आपल्या भावना व्यक्त करतातच.
सनातन संस्कृतीच्या अतीशय प्राचीन आणि दुर्मिळ साहित्य रचनांमधून त्या परमात्मा परमेश्वराच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे आणि त्याच्या मानवजातीवरील उपकारांचे स्तवन करण्यासाठी अनेक साहित्य कृती निर्माण केल्या आहेत, हा प्रवाह आजही अनिर्बंध रितीने चालू आहे. परिणामी लक्षावधी कवने पहावयास मिळतात आणि त्या अनुषंगाने विचार भेद देखील अस्तित्वात आहेत. भक्ति कशी असावी ह्या बाबत मतभिन्नता प्रचंड असली तरी ईश्वराच्या अस्तित्वाविषयी एकमत आहे हे नाकारता येणार नाही.
हिंदु धर्मात भक्तिचे असंख्य प्रकार असणं हे स्वाभाविक आहे कारण या संस्कृतीचा इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे ज्या मुळे वेळोवेळी पूजा, प्रार्थना विधीमध्ये बदल घडत आले आहेत. परंतु मूळ स्वरूपात दोन प्रमुख प्रकार विषद करण्यात आले आहेत, त्यांपैकी एक म्हणजे सगुण साकार रुपाची भक्ति, जी उपचारांसह करावी अशी आहे. आणि दुसरी म्हणजे निर्गुण निराकार 'रूपहिन_वर्णहिन' अशा स्वरुपाची भक्ति.
सगुण साकार ईश्वराच्या पूजा विधी चे असंख्य प्रकार आहेत, किंबहुना ते घराघरात आपापल्या सोयीनुसार निश्चित केले गेले आहेत आणि त्यांवर कुणाला आक्षेप घ्यावासा वाटत नाही कारण अंतिम ध्येय साध्य व्हावे असा विस्तृत विचार त्यामागे असावा. प्रतिकांसन्निध बसून प्रार्थना करणं हा सोप्यात सोपा असा भक्तिचा मार्ग आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. ह्या पेक्षा थोडं पुढे जाऊन काही मंडळी व्रते_अनुष्ठाने करतात ज्याला काही अंशी हठयोगाची किनार असते. जसजशी ईश्वर भक्तीची आवड निर्माण होते, तसतशी ती विविध प्रकारे अनुसरण्याची ओढ जागृत होते. यातूनच समविचारी लोक सार्वजनिक स्तरावर मोठमोठ्या उत्सवांचे आयोजन देखील करतात. असो! ही झाली सगुण साकार रुपाची भक्ति करण्यासाठी अवलंबिलेली काही उदाहरणे. ह्या सगुण साकार भक्तिच्या सहाय्याने काही नवस सायास करून इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे हा देखील एक प्रकार अस्तित्वात आहे.
निर्गुण निराकार भक्ति पंथाचा अवलंब करण्याची प्रथा बहुत: साधक, तपस्वी किंवा संन्याशी आणि भटकंती करावी लागते अशा लोकांची सुविधा म्हणून प्रचलित आहे. ह्या प्रथेत नाम संकीर्तन अर्थात ईश्वर स्तुती करताना त्यात रममाण होऊन ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा अनुभव घेण्याची क्रिया सुद्धा अवधारित आहे.
सगुण साकार भक्ति ही प्रपंचात राहून सुद्धा करता येते तर निर्गुण निराकार भक्ति पंथाचा अनुयायी सहसा निर्विकार बनण्याचा प्रयत्न करतो. सर्व संग परित्याग करून केवळ ईश्वर भक्तीची परिपूर्णता साधणं हे एकमेव ध्येय निष्ठूर पणे अंगिकारणे हा ह्या भक्ति प्रकाराचा मूळ गाभा आहे.
समारोप करताना हे विशेषत्वाने लिहावेसे वाटले की गंमत आणि विरोधाभास असा की, ईश्वर एकच आहे हे सगळ्या धर्माच्या धुरिणांना मान्य आहे तरीही त्यांना एकात्मतेने भेदभाव विरहित मानवी जीवन यापन कशा पद्धतीने करता येईल ह्याचा सूक्ष्म विचार करणं पसंत नाही. उलटपक्षी आधुनिक प्रचार माध्यमांचा अमर्याद वापर करून ही मंडळी धर्माधिष्ठित वसाहतवाद स्थापित करण्यासाठी आसुसलेली दिसतात.
अशा ह्या विचित्र सद्यस्थिती मुळे मानवी सभ्यतेची अतोनात हानी होत आहे.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home