भ्रम आणि वास्तव
कालच्या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील बातमीतून असं दर्शविण्यात आलं आहे की नुकत्याच नुपूर शर्मा ह्या भाजपाच्या प्रवक्तीने महंमद पैगंबराविषयी अपशब्द वापरले, त्यामुळे भारत आणि तेल उत्पादक मुस्लिम देशांमध्ये वितुष्ट येईल आणि ते भारताला खूपच घातक ठरेल. ह्या प्रसंगी काही मुद्दे उपस्थित होतात ज्यांचा उहापोह करणे संपूर्ण भारतीय जनतेच्या ज्ञानवर्धनासाठी आवश्यक आहे तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीला देखील समजून घेणे गरजेचे आहे.
१ प्राथमिक विचार करता हे सुस्पष्ट आहे की नुपूर शर्मा काही इतिहासाचं पुनर्लेखन करणारी व्यक्ती नाही. तीने जो काही अपशब्द किंवा स्टेटमेंट केले आहे ते ह्या आधीच्या लेखनातून उद्धृत केलेले आहे. त्यामुळे हा विषय राजकीय न बनवता इतिहास संशोधकांनी हाताळायला हवा.
२ धर्मनिरपेक्षतेच्या अवडंबराखाली जगणाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून भारतात काय चाललंय ते बघायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी विना अभ्यास कधी विधाने केलेली दृष्टीस पडणे दुरापास्त असते. परंतु तरीही जर एखाद्या प्रवक्त्याने काही संदिग्ध विधान केले असेल तर विरुद्ध बाजूला असलेल्या व्यक्तींची विधाने सुद्धा तपासायला हवीत. टोकाची विधाने करताना निरनिराळ्या माध्यमातून अनेक स्वनामधन्य कूपमंडूक प्रवृत्ती रोज दृष्टीस पडतात. त्यांना खोडून काढताना एखादेवेळी उच्चारात प्रखरता आली तर ती प्रसंगानुरूप आहे आणि समोरच्या व्यक्तीने माफी मागितली तर क्षम्य ही आहे ही भावना जागृत व्हायला हवी. पण नुपूर शर्माच्या विषयात तसे न होता तीला जागतिक स्तरावरील गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल गेली हे विक्षिप्त पणाशिवाय इतर काही नाही. ह्या योगे जगभरातील संकुचित प्रवृत्ती उजागर झाल्या आहेत.
३ त्या वृत्तामध्ये आकडेवारी निशी किती भारतीय आखाती देशात कामं करतात हे दाखवून अश्या भितीचा आभास निर्माण केला आहे की करोड भर लोकांना बेरोजगार व्हावे लागेल आणि त्यांच्या भारतात परत येण्याने येथे प्रश्न निर्माण होतील. येथे एक साधा प्रश्न विचारण्याची पाळी येते की काय ह्या मनुष्य बळाला हे देश उपकृत होऊन पोसतात, की त्यांची निकड म्हणून सांभाळतात? येथे नोंद घेतली जावी की ह्या देशांची उद्योजकता आणि तदनुषंगाने अर्थ व्यवस्था सुचारू पणे चालायला ह्या भारतीयांची मेहनत आणि बौद्धिक क्षमता कारणीभूत आहे. त्यांना घरी पाठविण्याची हिम्मत पुढील अनेक दशके एकाही आखाती देशात नाही. ह्या देशातील सर्वात विकसित देश संयुक्त अरब अमिराती पूर्ण पणे ही वास्तविकता जाणून आहे आणि म्हणूनच ते सतत भारतासोबत आहेत. ज्या कतार देशाने ही वावटळ उठवली तो देश कधीही भारतधार्जिणा राहिला नाही आणि ओपेक चा (तेल उत्पादक आखाती देश) सदस्य देखील नाही. मग अचानक इतर देशांतील निषेध कसा समोर आला? तर मुळात अल जझीरा ही आखातीय वृत्तसेवा कतार मधील आहे आणि आपल्या माध्यमातून सतत भारत विरोधी कारवायांना प्रोत्साहन देत असते.
आज ही सर्व घटना घडून दोन आठवडे होत आहेत आणि जवळपास नवव्या दिवशी जागोजागी प्रतिक्रिया उमटल्या आहेत म्हणजेच एका विशिष्ट उद्देशाने हा विषय तापवला गेला आहे. जगभर भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमसम्राटांना पुन्हा एक संधी ह्या विषयातून दिसली आणि त्यांनी आपला खेळ खेळायला सुरुवात केली. भारतात चालणाऱ्या परंतु विदेशी मालकीच्या माध्यम समूहांनी सुद्धा हीच छद्मी खेळी अवलंबिली आहे.
४ हे खरे आहे की भारताला इंधन आयातीकरिता बऱ्याच अंशी आखाती देशांवर अवलंबून रहावे लागते. परंतु हेही तितकेच खरे आहे की ह्या देशांची अर्थव्यवस्था सुद्धा बऱ्याच अंशी भारतावर विसंबून आहे. येथे नमूद करणे अप्रासंगिक ठरणार नाही की, १९६२ पर्यंत अर्थात तेल उत्खननात हे देश अग्रभागी येईपर्यंत ह्या देशांमधून भारतीय रुपयातच सगळा व्यवहार चालायचा. सौदी व्यतिरिक्त इतर देशांचे स्वतः चे चलन देखील नव्हते, भारतीय रुपया हेच अधिकृत चलन होते. विशेष करून हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याकाळी अमेरिकन डॉलर देखील येथे प्रचलित नव्हता. म्हणजेच उण्यापुऱ्या ५० वर्षांचा कालावधी लोटला आहे की ह्या देशांची अर्थव्यवस्था सुधारली आहे. अन्न आणि पाण्यासाठी सुद्धा तेथील नागरिकांना समुद्रात चाचेगिरी करावी लागायची. थोडक्यात काय तर त्यांनी आमची आर्थिक कोंडी केली जाऊ शकते हा भ्रमाचा भोपळा फोडून आम्हाला आत्मविश्वासाने पुढे यावे लागेल.
५ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की वरील सर्व आखाती देशांत लोकशाहीचा मागमूसही नाही. तेथील हुकूमशाही राजवट जे करील ते प्रमाण आहे. तेथील क्षेत्रीय वृत्त व्यवस्था देखील पूर्णपणे एकावलंबी आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात जणू काही नाहीच. त्यामुळे भारताविरुद्ध असं काही वातावरण तेथे कधीच निर्माण झाले नाही आणि होणारही नाही.
६ राहिला प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था कोलमडेल ह्याचा, तर येथे उल्लेख करावाच लागेल की भारत हा उर्जा स्त्रोतांच्या बाबतीत गंभीर असून मोठ्या प्रमाणावर भूगर्भातील स्त्रोतांवरील आपली निर्भरता कमी करीत चालला आहे. अपारंपारिक ऊर्जा नियमन करण्यासाठी सर्वच स्तरावरून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ज्या योगे येत्या काही वर्षांत आम्ही उर्जेचे निर्यातक ठरणार आहोत. संकटातून उपलब्धीचे मार्ग शोधायला पाहिजेत असे दस्तुरखुद्द विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतात. मग कोणत्या भयगंडातून नुपूर शर्मा किंवा नवीन जिंदाल ह्या युवा नेत्यांची नाळ तोडायचा घृणास्पद प्रकार होत आहे? भारताने अलिकडेच निर्यातबंदी संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत, त्यातून येथील अनेक माफियांच्या दुकानदारी वर गदा आली आहे आणि त्यांनी विदेशातील इतर शक्तिंबरोबर केलेले करार कचरा बनत आहेत. आणि म्हणून असे विघातक समूह भारताची छबी अर्थात केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारची छबी खराब करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
एकूण निष्कर्ष काय तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या धुरिणांनी पक्षविघातक असे निर्णय तडकाफडकी घेऊ नयेत तसेच यकश्चित क्षमता असलेल्या आंतरराष्ट्रीय पटावरील प्याद्यांना घाबरून आत्मघातकी विचार करू नये. भारतीय जनता सदैव संपूर्ण विश्वासाने भाजपच्या पाठिशी आहे व स्वतः होऊन कपाळमोक्ष करुन घ्यायचा नसेल तर आपल्या मतदार जनतेच्या मनातील भावनांना प्राधान्य देण्याचे करावे. २०१४ पूर्वी अत्यंत निराशाजनक वातावरणातून भारतीय जनतेने मोदींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भाजप कार्यकारिणी ही त्या मतदारांना अधिक जबाबदार आहे.
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home