तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे
मराठी भाषेतील प्रसंगोपात्त अशा अनेक म्हणींपैकी "तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे" ही एक म्हण. वरील नऊ शब्दांत खूप मोठा आणि चपखल असा अर्थ सामावलेला आहे जो नुकत्याच पदावनत झालेल्या तथाकथित महा विकास आघाडीला लागू पडतो. ऐंशी पार झालेले स्वनामधन्य राजकारण धुरीण जाणते राजे आधुनिक चाणक्य आणि इतरही अनेक उपाधींचा जोगवा उराशी बाळगून देशाचा गाडा हाकण्याची स्वप्ने दशकांपासून बघत असलेले साहेब, २०१९ साली गोडगोड 🥕 गाजरं घेऊन राजकारणाच्या बाजारात उतरली. पाचवीत गटांगळ्या खाणाऱ्या मुलाला जर कां मॅट्रिक मध्ये मेरिट मिळवून देतो असे सांगितले तर तो जशा माकड उड्या मारत अती उतावळा होईल तद्वत आधुनिक धृतराष्ट्र आणि आंधळ्या संजयाचे झाले आणि विधीनिषेध शून्य 'महा भकास बिघाडी'ने राजकीय गर्भोदर फोडून महाराष्ट्र राज्य रसातळाला नेण्यासाठी जन्म घेतला. तीन भिन्न प्रकृतीच्या रसायनांचे कडबोळे एकत्र येऊन जेव्हा असं काही घडते तेव्हा त्यातून विषादच निर्माण होतो, "अती महत्त्वाकांक्षे पोटी आत्मघात" अशी स्थिती निर्माण होते. ह्या महा भकास बिघाडीच्या बाबतीतही तेच झाले. त्यांनी जो भस्मासूर उभा केला तो संस्कारहीन आहे, आत्मघाती आहे हे कळू नये इतपत जेव्हा मती भ्रष्ट होते तेव्हा रसातळाला जाण्यावाचून पर्याय उरत नाही.
अनैसर्गिक संकराची परिणती ठरलेल्या ह्या बिघाडीचं आयुष्य एकतीस महीने टिकावे हे ही एक नवलंच म्हणावे लागेल. असंस्कृत विचारांशी सुसंस्कृत विचारांची लढाई असल्याने कदाचित इतका वेळ लागला असावा. असो!
महाराष्ट्र राज्य म्हणजे आमची खाजगी मालमत्ता आहे आणि येथे आम्ही जे करू ते मान्य समजावेच लागेल अशी जी नशा चढली होती ती पुन्हा अनेक दशके डोक्यात जरी आली तरी धडकी भरेल असा हा परिणाम आपण नुकताच बघितला आहे. निर्लज्ज पणालाही मर्यादा आहेत हे ह्या प्रसंगी सिद्ध झाले आहे. राज्यातील जनतेला आव्हान ठरलेल्या जीवघेण्या कोरोना साथीला भ्रष्टाचाराचं कुरण समजून ज्यांनी कुणी हात बरबटून घेतले, त्या प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थांना जनता नीट समजून आहे आणि ह्या पुढे त्यांचं वाटोळं केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून मी शिर्षक दिलंय "तेल ही गेले तूप ही गेले हाती उरले धुपारणे".
आता धुपारणे घेऊन जनतेसमोर कितीही ऊद जाळायचा खटाटोप केला तरी कधीच उखळ पांढरं करता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
(कवि 'रवि')

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home