Sunday, 3 July 2022

देवेंद्र, राजकारण, सत्ता आणि व्यक्तिमत्व

वयाच्या किशोरावस्थेपासून समाजातील विविध घटकांचा सहज आढावा घेण्याची सवय असलेला हा, आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक बनला त्या वेळी वय वर्षे २३. आणखी पुढे महापौर बनला तेंव्हा वय वर्षे २७. चढती कमान अशी की लगोलग भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा सदस्य अर्थात आमदार म्हणून निवडून आला आणि तेंव्हा पासून आज वयाची ५१ वर्षे झालीत सतत महाराष्ट्रधर्म समजून आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण न थकता न कंटाळता समाज सेवा करीतच आहे. स्वयंभू नेतृत्व काय असा प्रश्न कुणाला पडत असेल तर त्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीवन प्रवास अभ्यासावा. त्यांना 'अजातशत्रू ' असं संबोधलं जातंय ही राजकारणात वावरणाऱ्या कुणाला पण विलक्षण अशी उपाधी आहे आणि ती सार्थ रुपाने देवेंद्र फडणवीसांना लागू पडते. 
त्यांना नामोहरम करण्यासाठी क्षूद्र विचारसरणीच्या लोकांनी, माध्यमांनी किंवा हेतुपुरस्सर द्वेष करणाऱ्यांनी नको नको ते विभत्स प्रकार अवलंबिले पण जनमानसात भिनलेला हा नेता स्वतः कधी डगमगला नाही आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्याला पडू दिले नाही.
राजकीय परिपक्वता म्हणजे काय हे त्यांनी नुकतेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. महत्वाकांक्षेपेक्षा समाजाभिमुख निर्णय किती महत्त्वाचे असतात ह्याचं प्रात्यक्षिक त्यांच्या अगदी ताज्या कृतीतून सर्वांसमोर उघड झाले आहे. विधानसभेत सामान्य आमदार असताना पासूनच ज्याला अभ्यासू, विचारशील, विनयी आणि अशा अनेक विशेषणांनी संबोधले गेले त्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधीपक्षनेते पद आणि मुख्यमंत्री पद दोन्ही भूषवितांना तेवढाच संयम आणि समजूतदार पणा दाखविला आहे.
ह्याची साक्ष त्यांचे विरोधक देखील विधान भवना बाहेर मुक्त पणे देतात हे त्यांच्या विरुद्ध प्रचार करणाऱ्या माध्यमांतील पत्रकार किंवा वृत्त समीक्षक सहजपणे सांगतात.
सद्य परिस्थितीतील घटनांचा हवाला देऊन विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध वावड्या उठवायला सुरुवात केली आहे की वरिष्ठांनी त्यांचे पंख छाटण्याकरिता त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले आहे वगैरे वगैरे. 
मित्रांनो येथे विशेषत्वाने हे आठवावे लागेल की २०१४ साली त्यांना मुख्यमंत्री पदी बसविण्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रमुख सहभाग होता. पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरील राजकीय शक्तींनी त्यांना भरघोस विरोध दर्शविला असताना देखील मोदींनी तेंव्हा कुणाचेही काही चालू दिले नाही. २०१९ च्या निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले तेही देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने पारडे झुकवू नये म्हणून त्या विजयाचे श्रेय इतरांना मिळावे असे प्रयत्न होत असताना हाच देवेंद्र त्या निवडणुकांच्या विजयाचे श्रेय संपूर्ण कॅडर आणि ज्येष्ठ नेत्यांना देता झाला. मध्यंतरी च्या काळात ज्या काही पोट निवडणूका किंवा नगर परिषद, ग्राम पंचायत किंवा इतर तदृश निवडणुका मधील यश ही त्याने सर्वांच्या मेहनतीला दिले. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ असो की आपदा परिस्थिती असो प्रत्येक वेळी स्वतः पुढे होऊन त्या त्या स्थळी पोचताना त्याने कधी जिवाची पर्वा केली नाही. आजवर ४ वेळा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून दैवी कृपेने जीवंत असलेला आणि जनसेवेसाठी सही सलामत असलेला देवेंद्र हा एकमेव नशीबवान जननेता आहे. 
महाभारतातील एक प्रसंग मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. तो असा की कौरवांच्या आमंत्रणावरून पांडव द्यूत खेळण्यासाठी अत्यंत अनिच्छेने परंतु त्या काळातील रिती नुसार पोचले. द्यूतासाठीचे फासे शकुनी ने जरासंधाच्या अस्थींचे बनवून घेतले त्या मागील उद्देश असा की ते पांडवां विरुद्ध दान देतील. पण भीमाला घाबरून ते फासे पांडवांच्या पारड्यात दान टाकू लागले. हे आश्चर्य समजून येईपर्यंत पांडव विजयी होत राहिले पण महाधूर्त शकुनी ने त्याची तोड शोधली आणि दुसरे दिवशी भीमाला सर्वात मागे बसायला भाग पाडले. परिणामी कौरवांच्या बाजूने दान मिळू लागताच शकुनी ने पांडवांना द्रौपदीसह सगळं काही पणात हारायला लावले, वनवास अज्ञात वास वगैरे वगैरे अटी लादल्या, हे निश्चित करण्यासाठी. त्या वेळी धर्मराजाने मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे जरी म्हटले नव्हते तरी पुन्हा येण्याची सुप्त प्रतिज्ञा मात्र त्याने नक्कीच केली होती हे पुढील काळात स्पष्ट झाले. 
शिवसेनेच्या तळागाळातील सैनिकांनी ज्यांना उत्तम रित्या मतदान करून भाजपासोबत सत्ता सांभाळण्याचा कौल २०१९ ला दिला होता, त्याला झुगारून कौरवी वृत्तीच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी जेंव्हा अभद्र युती करून सरकार बनवले तेंव्हाच हे ही निश्चित झाले होते की ह्या कौरवांचा नि:पात होणार. 
फार काळ वनवासात न राहता वर्तमान पांडवांनी अज्ञातवास त्यागला आणि सत्तांतर घडवून आणले.
मित्रहो ह्या सगळ्या नाट्यात देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याइतपत आपण सगळे सूज्ञ आहात. येथपासून पुढे जसजशी ह्या सरकारची वाटचाल सुरू राहील तसतशी आपल्याला खात्री देखील होईल की देवेंद्र हा अति महत्त्वाकांक्षी नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा "सखा" आहे. 
नवगठीत शिवसेना भाजप युती सरकारला कुणी कितीही अपशकून किंवा दृष्ट लावण्याची शिकस्त केली तरीही हे सरकार आपला कार्यकाळ मजबुतीने चालेल आणि जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करील ह्या विषयावर मी नि:शंक आहे.
कवि 'रवि'






0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home