Thursday, 23 July 2026

भक्तांचिया साठी बघा उभा जगज्जेठी

भक्तांचिया साठी बघा उभा जगज्जेठी 
चंद्रभागे काठी पंढरीस 

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा 
वाट पाहे देव जिव्हाळ्याने 

देह भोग सारे विसरून जग 
धावती वैष्णव वारी संगे 

विठ्ठल नाम जप वाजे टाळ नी मृदंग 
संगे आळवती संत माऊलीसी 

वारी पंढरीची जणू मोक्षधाम एक 
ज्ञानियांनी मेख ओळखीली 

'रवि' म्हणे देवा मला एक तुझा ध्यास 
देई मज ठाव चरणांशी 
कवि 'रवि'

Sunday, 19 July 2026

आठोळी: आक्रित

झुरळांच्या जोडीला वाघोबा आले 
काय जादू कोण जाणे आक्रितच झाले 
पेंग्विन ची गर्जना घाबरवण्या साठी  
ह्याची परिणीती स्वतःच्या मलीद्या साठी 
काकांच्या वाड्यावर अलगच घाई 
समजत नाही कोण कोणा पळवून नेई 
खोके पेट्या देशभर वणवण फिरताहेत 
संधीच्या शोधात भलेभले झुरताहेत 
कवि 'रवि'

Sunday, 12 July 2026

प्रकर्ष

दर्शनास्तव तव आतुर मी गुरुराया 
ठेवुनी तव तो हात मस्तकी दावी उपाया 
चरण स्पर्श मजला की मिळावा 
एकची क्षण तो जणू की विसावा 
शांत करावे विद्ध मनांसी 
आशीर्वच ते देई मजसी 
तू करुणामय तूची त्राता 
चिंता कसली नुरली आता 
झाले दर्शन परिहार जहाला 
अंतरीचा तम भाव निमाला 
सत्वार्थे काया ही झिजावी 
देई इतुके बळ गुरुराया 
दर्शनास्तव तव आतुर मी गुरुराया 
कवि 'रवि' 


Saturday, 4 July 2026

आठोळी:- सावळा गोंधळ

भंगेड्याचा भोंगा भांडुपात वाजतोय
चहा बिस्कुट्या तेथे शिव्यांवर हासतोय 
'राज' कारण आताशा बावरल्यागत झालंय 
आपल्याच बर्बादीवर बघा भावी पीयम हासतोय 
रॉहिट ची पोपटपंची जसा शिळ्या कढीला ऊत 
आजोबांच्या बोबड्या बोलांवर थुई थुई नाचतोय 
कधी कोण जाणे ह्यांना होईल उपरती 
शेपूट घाल्यांच्या आरोळ्यांनी महाराष्ट्र गाजतोय 
कवि 'रवि'

Thursday, 2 July 2026

परस्पेक्टिव्ह

बघता बघता कमळाच्या कुंडात 
तीनशे साठ झालीत 
बडबोल्यांच्या "कंडाने" 
विरोधी भुईसपाट झालीत 
सोंग्याबोंग्यांच्या कोलांट्या उथळपणाचा कळस 
मी मी म्हणणारी भांडा'रे' पाताळपंथी झालीत 
चलन बंदी च्या वेदनांना नाही कुठली प्लास्टी 
तळघरे-कंटेनर आताशा चलन बाह्य झालीत  
मुंबई म्हणते कितीही घासा मी नाही कुणाच्या बापाची 
माझ्या जीव्हाळ्याची लेकुरे आधीही असंख्य झालीत 
कवि 'रवि'