आधुनिक हिंदु समाज आणि देशापुढील समस्या
कोणे एके काळी.....हो कोणे एके काळीच म्हणावे लागेल. भारतामध्ये हिंदु संस्कृतीचा उगम झाला आणि ती परकियांची असंख्य आक्रमणे झाली तरीही अबाधित राहिली. हिंदुंचे संस्कार मुख्यत्वे घराघरांतून प्रत्येकाच्या मनात आणि आचरणात झिरपत जायचे! यवनांच्या आक्रमणाने काही हिंदु आपला धर्म सोडून मुसलमान बनले त्याला अनेक कारणे आहेत, असूद्या पण त्यांची जीवनशैली मात्र फार काही बदलली नव्हती कारण त्यांना हे चांगले ठाऊक होते की आपल्या परिवाराची नाळ ही हिंदुंसोबत जोडलेली आहे.
साधारणपणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये ख्रिस्ती धर्मिय पादऱ्यांचा शिरकाव झाला आणि त्यांनी अतीशय व्यवस्थितपणे येथील आदिवासी जनजातींमध्ये आपले पाय पसरायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या अभ्यासात त्यांनी हे हेरले होते की भारतातील जनजातींमध्ये हिंदु धर्माच्या धुरिणांचा फारसा पगडा नाही आणि त्या आदिवासीयांना शहरं,गांवे किंवा मंदिरे ह्याचं फारसं कौतुक नाही. ते आणि त्यांच्या परंपरा ह्या प्रामुख्याने त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तर ह्या पादऱ्यांनी चलाखीने ह्या लोकांना भ्रमित केले आणि त्यांचे धर्मांतरण केले. दुसऱ्या अर्थाने त्यांनी भारतात ख्रिश्चनांची संख्या वाढविण्यावर भर दिला, त्यांच्या जीवनशैलीला कोणतीही क्षती न पोचविता हे केले. असो!
भारतीय समाजातील बहुतांश हिंदु चिंतकांनी समग्र भारत ही संकल्पना अवलंबून भारतामध्ये राज्य करणाऱ्या परकीय शक्तिंना संपवून अखंड भारत स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि त्याकरिता अवघा देश स्वातंत्र्य प्राप्तिच्या आशेने प्रेरित झाला. घोर संघर्ष झाला, लाखोंच्या घरात जीव हानी झाली, हजारो परिवार नष्ट झाले आणि हिंदु मुसलमान अशी फाळणी होऊन आधुनिक भारताचा उदय झाला. स्वातंत्र्योत्तर काळात अर्थातच सत्ता त्यांच्या हाती गेली जे सतत तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या आसपास होते आणि चाणाक्ष पणाने स्वतः ला भारतीयांचे प्रमुख म्हणून दर्शविण्यात यशस्वी होते. तसं सिद्ध करताना त्यांनी अनेक सच्च्या देशभक्तांचा बळी दिला तो भाग वेगळा. उल्लेखनीय हे की त्यात ही बहुसंख्य हिंदुच होते. राज्यकर्ते म्हणून स्वतंत्र भारताला हिंदुद्वेषी पण धर्माने हिंदुच असलेले नेतृत्व लाभले आणि त्यांनी शिस्तशीरपणे हिंदुंच्या जीवन पद्धती वर आक्रमण करायला सुरुवात केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वेच्छेने लढलेल्या हिंदुंना कह्यात घेणे सहजी शक्य नव्हते आणि म्हणून त्यांच्या संस्कारशील मनांवर घाला घालण्याचे षड्यंत्र रचले गेले. इतिहास बदलण्यापासून तर सणावाराला सुट्टी कपात करणे, मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांच्या तथाकथित सणांना फाजिल महत्त्व देणं, रविवारी साप्ताहिक सुट्टी, इंग्रज वापरत असत ती साधन सामग्री घरा घरात स्टेटस सिम्बॉल बनवून हिंदुंची स्वधर्माप्रति असलेली आस्था कमकुवत करण्यात ती सत्ताधारी मंडळी बऱ्याच अंशी यशस्वी देखील झाली आहेत. कॉन्व्हेन्ट चं शिक्षण हा जणू उच्च वर्णीय असल्याचा संकेत निश्चित व्हायला लागला. मुसलमान समाजातील बहुतांश परिवार गरीब आणि आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्ना करिता हिंदुवरच अवलंबून असल्याने त्यांनी फारसा कधी द्रोह पत्करला नाही परंतु, जसजशी सामाजिक स्थिती बदलू लागली, त्यांच्या मशिदींमधून हिरव्या पगडी वाल्यांची अर्थात तबलिगी जमातीच्या लोकांची वर्दळ वाढू लागली तसतसे ते देखील हिंदु विरोधाने ग्रसित होऊ लागले. संधीसाधू राजकारणी, विशेषतः कांग्रेस आणि त्यांच्या विच्छेदनातून प्रकट झालेले इतर क्षेत्रीय पक्ष आजतागायत ह्या भट्टीवर आपला पानगा शेकताहेत.
ह्या अशा परिस्थितीत आजचा हिंदु नेमका कुठे आहे ह्याची मिमांसा करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणूनच ह्या लेखाचं शीर्षक आधुनिक हिंदु समाज आणि देशापुढील समस्या असं दिलेलं आहे. जेंव्हा पासून म्हणजे साधारण तीन दशकांपासून हिंदुंच्या हे ध्यानात येऊ लागले की तत्कालीन सत्ताधारी हे आपल्या विरुद्ध इतर धर्मीय असं समीकरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, साधारण तेंव्हा पासूनच हिंदुंमध्ये एक प्रकारची चिंता जागृत झाली आणि त्यांनी ह्या विषयावर उघडपणे व्यक्त होण्यास सुरुवात केली. हे ध्यानात आल्यावर तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी पवित्रा बदलला आणि हिंदु मध्ये जाती जातीत तेढ निर्माण करीत पुढचा कांहीं काळ म्हणजे एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंत राज्य करण्यात यश देखील मिळविले.
रामजन्मभूमी चा विषय हाती घेऊन विश्व हिंदू परिषदेने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील तमाम हिंदुंच्या मनात धर्माविषयी प्रखर आस्था निर्माण केली आणि देशभरात विकृत मनोवृत्तीच्या राजकारण्यां विरुद्ध जनतेचा आक्रोश प्रकट होऊ लागला. आजघडीला तसे शेकडो राजकारणी भ्रष्टाचार आणि इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात तरी आहेत किंवा आरोपी म्हणून कलंकित ठरलेले आहेत. देशातील ही वैचारिक क्रांति आम्हाला एक सबळ राष्ट्र निर्माण करण्यासाठी सकारात्मकच आहे. हल्लीची न्यायासने ज्वलंत विषयावर सखोल चिंतन करून निर्णय देताना आढळतात ही हिंदुंच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
बदलत्या काळातील समस्यांचा आढावा घ्यायचा झाला तर असं निश्चित पणे म्हणावे लागेल की आजच्या हिंदु समाजामध्ये दोन परस्परविरोधी प्रवाह निर्माण झाले आहेत आणि ते दोन पिढ्यांना ग्रासून आहेत. एक म्हणजे पन्नास पार झालेली पिढी आणि दुसरी म्हणजे जागतिकीकरणाच्या विळख्यात सापडलेली पण आधुनिक भारताची शिल्पकार समजल्या जाणारी नुकतीच तिशीला आलेली तरूण पिढी. जुन्या पिढीने आपला धर्म आणि संस्कार स्वतः शीच मोठा संघर्ष करून जपले आहेत पण वर्तमान पिढी मात्र एक विसंगती समवेत आपल्या हिंदु असण्याची पुरस्कर्ती आहे. ही पिढी मंदिरात नियमित जाते, चतुर्थी सारखे उपवास देखील करते पण धर्म शास्त्रानुसार आचरण काही करीत नाही. अतीशय सुदृढ अशी विवाह संस्था ही हिंदु परिवार एकत्र आणि अभेद्य राहण्याची गुरुकिल्ली आहे पण दुर्दैवाने आजचा हा सुशिक्षित आणि संसाधन युक्त हिंदु तरुण वर्ग ह्या उच्च संस्थेला मारक ठरत आहे.
सुशिक्षित मुले आणि मुली विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करणं हे चुकीचे मानत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे लेखी 'विवाह आणि कुटुंब' ह्या दोन्ही गोष्टी गौण ठरत चालल्या आहेत. हिंदु धर्मात घटस्फोट नावाची संकल्पना अस्तित्वात नसताना आपण मात्र वरचेवर घटस्फोटांच्या बातम्या ऐकतो,वाचतो, प्रसंगी अवतीभवती अनुभवतो देखील आहोत. ज्यांनी घटस्फोट घेतला आणि त्यांच्या घटस्फोटामुळे विस्थापित झाले ते असे सगळेच मुख्यतः आपले हिंदु धर्मीय असल्याने धर्माच्या शिकवणीला प्रचंड नुकसान होत आहे. ह्या ठिकाणी मी निर्भिडपणे असेही म्हणेन की आमच्या धर्ममार्तंडांना किंवा समाज धुरिणांना हा विषय कुठे ही चर्चिला जावा असे वाटत नाही.
धार्मिक बाबतीत गुरू म्हणून असे अनेक लोक आपापली दुकाने लावून बसले आहेत की ज्यांना ही नवी साधन संपन्न पिढी आपले ग्राहक वाटतात आणि त्यांच्या वैयक्तिक समस्या कमाइचं साधन वाटतात. त्यांचं आत्मीयतेने उद्बोधन मात्र करावंसं वाटत नाही. अत्यंत दिमाखात असली मंडळी दर्शनी स्वरूपात संन्याशी पण वास्तवात राजभोग उपभोगत ह्या पीढीला वाकुल्या दाखवीत असतात.
सारांश असा की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्युच्च पातळीवर पोचताना आम्ही हिंदु, धार्मिक शुचितेला तिलांजली देत चाललो आहोत हे लक्षात घेऊन अविलंब कार्यरत व्हायला हवेत. दर हजार पाचशेच्या वस्ती मागे आपली समाज सभा नित्यकालिक स्वरूपात उपलब्ध व्हावी. विविध सामाजिक अथवा धार्मिक उत्सवांचे क्रियान्वयन व्हायला हवे. विवाह संस्था केवळ बळकटच नव्हे तर चिरकाल टिकेल अशी तजवीज करायला हवी. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून ज्ञान आणि विज्ञान यांची सांस्कृतिक दृष्टीकोनातून सांगड घातली जावी. जागोजागी तरुणांना आकर्षित करतील असे सामाजिक कार्यक्रम सतत होत रहावेत.
न्यूटन च्या नियमाप्रमाणे आमच्या मध्यकालीन चुकांमुळे संस्कृती चा ऱ्हास झाला आहे तर आताच्या चांगल्या कृतीतून पुन्हा एकदा हिंदु धर्म आणि मान्यता उंची गाठतील आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनण्याची आमची वाटचाल प्रभावी ठरेल.
धर्मो रक्षति रक्षित:| इति||
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home