महाराष्ट्र माझा
कृष्णा गोदा भीमा कोयना
मुळा मुठा च्या सह ती पवना
तापी पूर्णा वर्धा वेण्णा
इंद्रायणी कुंडलिका ही जाणा
पंचगंगा अन पाताळगंगा
वऱ्हाड भिजविते पैनगंगा
तिला सोबती ती वैनगंगा
नीरा रंगावली भातसा
चंद्रभागा अन तशी तानसा
नाग नदी सौंदर्य वाढवी
कन्हान अमुची तृषा भागवी
किती वर्णाव्या ह्या जलदात्री
अतुट तयांची आम्हांवरी प्रिती
सातपुडा संह्याद्री अजिंठा
सातमाळा चा अमूल्य वाटा
तोरणमाळ अधिक तो पन्हाळा
शिरसोली डोंगरही मोठा
उत्तर दक्षिण दूधगंगा
सवे भुषविती चिकोडी रांगा
बालाघाट ही असे संगती
भव्यता तयांची वर्णू मी किती
कला कुशलता समृद्ध आमुची
धार जहाल ती तलवारीची
स्वराज्याचा एल्गार जहाला
शिवबा अमुचा राजा झाला
भूक शमविते अमुची माती
बळीराजाचे कष्टही किंमती
उद्योगांचे जणू नंदनवन
भक्ति प्रार्थनेने ही पावन
संत महात्मे उदंड झाले
कर्मयोगी जन भरुन पावले
शांति प्रीतिची सदा कामना
धर्मापरी तरी दृढ भावना
असा असे महाराष्ट्र हा माझा
कवि'रवि' च्या कवनांचा राजा
जय महाराष्ट्र
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home