Monday, 15 August 2022

७५ वा स्वातंत्र्य वर्धापन दिन आणि आजचे आम्ही

१८५७ पासून च्या अधिकृत स्वातंत्र्य चळवळीला फळ प्राप्त झाले ते १९४७साली. आणि तेव्हा पासून आजतागायत अनेक उतार चढाव अनुभवत आमची लोकशाही ७५ वय वर्षांची झाली. योगायोगाने अशा राष्ट्रीय उत्सवांची गोडी असलेले भाजपा प्रणित मोदी सरकार गेले ८ वर्ष ह्या पूर्वी झालेली देशाची दुरावस्था सुधारण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहे. त्याचे आशादायी फळ देखील आम्ही विविध क्षेत्रातील विकासाच्या रुपाने बघतो आहोत. किंबहुना, अनुभवतो आहोत.
पंतप्रधानांच्या कालच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून एक खंत प्रकर्षाने जाणवली की इतके प्रचंड प्रयत्न करून सुद्धा ह्या देशातील भ्रष्टाचारावर लगाम लावणे त्यांना शक्य झालेले नाही. काळा पैसा निरंकुश पणे आजही जनित होत आहे. त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाला सकारात्मक कृतीतून प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी अमलात आणलेल्या असंख्य कल्पना अत्यंत फलदायी आहेत, देशाच्या आर्थिक विकासात मोलाच्या आहेत हे कळते आहे पण इच्छाशक्ती चा अभाव असल्याने आम्ही त्यांना दुर्लक्षित करून आपले दैनंदिन व्यवहार करतो आहोत. 
गंमतीशीर बाब ही की आमच्या पैकी प्रत्येकाला, अगदी तळागाळातील लोकांपासून, आदिवासी, वनवासी, शोषित, वंचित ते थेट श्रीमंत व्यक्ती पर्यंत सगळे मोदींच्या विकासात्मक कार्यक्रमाला सकारात्मक रित्या अनुमोदन देतात आणि अशा विकासाची दृष्टी शासनाकडे असावी हे मान्य करतात. परंतु, आपल्या दायित्वाच्या बाबतीत आळशीपणा करतात. दरवर्षी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून आपल्या भल्यासाठी घोषणा कराव्यात अशी अपेक्षा आणि त्यानुसार कृती व्हावी अशी मागणी करणाऱ्या आम्हां सर्वांना ह्या पुढे कटाक्षाने अंगी शिस्त बाणवून केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य करावे लागेल.
साध्या सोप्या पद्धतीने आपण काळा पैसा निर्माण होणार नाही याची काळजी घेवू शकतो, ती अशी. दैनंदिन व्यवहारात जे काही खरेदी करण्यासाठी आपण नगदी पैसे वापरतो, ते थांबवून थेट कार्ड पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंट करायची सवय लावून घ्यावी. आपण करीत असलेल्या खर्चाला आळा घालून राष्ट्रीय बचत योजनांमध्ये गुंतवणूक करावी आणि अधिकाधिक स्तरावर खरेदी केलेल्या वस्तुंचे अधिकृत बील घेण्यास विसरू नये. वाजवीपेक्षा अधिक नफा कमावला जातोय अशी उत्पादने लक्षात आल्यावर त्यांचं सोशल नेटवर्किंग द्वारा अधिकांश लोकांपर्यंत प्रसारण करावं. विशेषतः तयार खाद्यपदार्थ हे मनमानी भावात विकल्या जातात आणि त्या बाबतीत विक्रेते अरेरावी करतात हा सामान्य अनुभव आम्हा सर्वांना आहे. अशावेळी, अशा विक्रेता संघटनांचा सामुहिक बहिष्कार करण्यासाठी शक्यतो सगळ्यांनी एकीने प्रयत्न करायला हवेत. ह्या लोकशाही प्रधान देशाचा दैवदुर्विलास आहे की येथे ग्राहकांना वेठीस धरून जवळपास सगळ्याच संस्था, ज्यात शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्था सामावल्या आहेत, ग्राहकांचं शोषण करतात. न्यायालये किंवा न्याय व्यवस्थेशी संबंधित सर्व यंत्रणा त्यात वकील, सुरक्षा रक्षक आणि न्यायालय यंत्रणा समाविष्ट आहे, मनमुरादपणे गरजूंची लुबाडणूक करतात. या वस्तुस्थितीचा नि:पात करायचा घनघोर प्रयत्न आम्हालाच करावा लागेल. हे सदैव जागृत दृष्टीने लक्षात ठेवावे लागेल की शासन हे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिंचं क्षेत्र आहे आणि प्रशासन हे अशा शासनाच्या अधिपत्याखाली राबविले जाते. 
ह्या दोघांची हात मिळवणी झाली की अंत आपलाच होतो. तेंव्हा आपले प्रतिनिधी आपल्या कह्यात कसे राहतील ह्या साठी नियम, कायदे आणि नाहीच झाले तर आपला सामुहिक दबाव रहायला हवा. वर्तमान परिस्थितीत असे निवडून दिलेले प्रतिनिधीच आपले भक्षक बनतात ही ज्वलंत समस्या आहे.
सारांश असा की, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक भारताला खऱ्या अर्थाने चिरंतन समृद्ध करायचे असेल तर केवळ पंचाहत्तरी साजरी करून चालणार नाही तर, आमच्या प्रत्येक कृतीत शुचिता आणि शिस्त बाणवावी लागेल. बाह्य स्वच्छतेसाठी पहिले वैयक्तिक पातळीवर स्वच्छ वर्तन करावे लागेल.
जय हिंद!
कवि 'रवि'
(रविंद्र सरदेशमुख)

Sunday, 14 August 2022

७५ वा हीरक महोत्सवी स्वातंत्र्य दिन

इंग्रजी सत्तेच्या पाशातून भारतीय समाजाला स्वतंत्र देश परत प्राप्त होताना लक्षावधी भोळ्याभाबड्या जनतेला आपलं रक्त सांडावं लागलं ह्याचं स्मरण करण्याचा १५ ऑगस्ट हा दिवस. स्वातंत्र्य प्राप्त होत असताना भारत भूची शकलं झालीत ते आठवण्याचा हा दिवस.
१८५७ च्या पूर्वी पासून ज्या कुणा राष्ट्र भक्ताने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वतंत्रतेची ज्योत तेवत ठेवली, त्या प्रत्येकाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस. स्वातंत्र्य प्राप्तीचा जल्लोष करताना आम्ही उत्साह प्रिय भारतीय जनता एकमेकांना खूप शुभेच्छा देतो हे आमच्या जीवंत पणाचे उत्कृष्ट लक्षण अवश्य आहे. परंतु, त्याच क्षणी आमच्या अंतःकरणात अढळ स्थान निर्माण करून हसत हसत मरणाला सामोरे गेलेल्या प्रत्येक देशप्रेमी व्यक्ती च्या कुटुंबातील सदस्य आजच्या स्थितीमध्ये कसे आहेत, त्यांचं जीवनमान कशा प्रकारचे आहे ते समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय करण्याचा हा दिवस ठरावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपण भारतीय आज अवघ्या जगावर राज्य करीत आहोत. अशा वेळी आमच्या आजच्या सुखाच्या दिवसा साठी ज्यांनी प्राणार्पण केलं, संघर्ष केला, ऐहिक भौतिकाचा त्याग केला त्यांच्या परिवारांची सूची तयार करून, त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना हे सहज शक्य आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, सॉफ्टवेअर बनवावं आणि ग्राम पातळी पासून त्यात माहिती संकलन करण्यासाठी समाज सेवकांना प्रशिक्षित करावं असं मला वाटतं. धार्मिक स्थळे किंवा चॅरिटेबल संस्थांना आपण भरभरून आर्थिक मदत करीत असतो त्या पार्श्वभूमीवर आमच्या सुखासाठी आयुष्य उधळून देणाऱ्या ह्या देशबांधवांना आर्थिक मदत करणं हे देखील आम्हाला सहज शक्य आहे.
स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस साजरा करत असताना हा विचार मनात आला तो तुम्हाला सुद्धा सांगावा ह्या साठी आजचा हा लेखनप्रपंच आहे. 
आवडल्यास कृती मध्ये रुपांतरीत करावा अशी समस्त तरुण पिढी ला माझी नम्र विनंती आहे.
माझ्या भारत मातेचं खंडित स्वरूप नष्ट होऊन पुन्हा एकसंध भारत अर्थात अखंड भारत साकार होवो अशी प्रार्थना करतो.
जय हिंद
कवि 'रवि'
(रविंद्र सरदेशमुख)

Tuesday, 9 August 2022

पावसाची रिपरिप आणि मन

उभ्या पावसाची ती रिपरिप अनोखी
तशी रात्रही गडद धरुनिया काळोखी
जरी धुंद वात आणि मन हे उधाणे
वरी ही अधिरता सरे ना कां जाणे

कुणी पक्षी नाही पशू ना कुठे ही
दिसे कां प्रकाश नेत्र निरखोनी पाही
अशा ह्या क्षणी मजसी हुरहूर एक
द्यावी ती दुरोनी कुणी एक हाक

असो द्या दुरावा तरी हे करावे
असे शब्द द्यावे की प्रेमे भरावे
मला कां कुणाही क्षुधा एक त्याची
कृपा ही घडावी त्या परमात्म्याची
                     कृपा ही घडावी त्या परमात्म्याची
                     कृपा ही घडावी त्या परमात्म्याची
कवि 'रवि'

Monday, 8 August 2022

स्वतंत्रता का पर्व

स्वतंत्रता का पर्व आ गया
आओ हम सब हिल मिल जाएं
देश धर्म का ब्रीद उजागर
मधुर धुन में मगन हो गाएं

जन गण मन है मंत्र हमारा
सदा बहें खुशियों की धारा
अटल अटूट मन मस्तिष्क हमारा
राष्ट्र वृद्धि की सोच निभाएं
स्वतंत्रता का पर्व आ गया........

जाति पाती का भेद मिटाकर
भगवा ध्वज को अर्पित होवें
सत्य सनातन अपनी संस्कृति
समरसता की नींव बनाएं
स्वतंत्रता का पर्व आ गया........

दिन दुखियारा कोई नहीं हो
घर में सुख और शांति समाएं
विद्या शक्ति और समझबुझ
हम से सच्चे दिल कार्य कराएं

स्वतंत्रता का पर्व आ गया
आओ हम सब हिल मिल जाएं
देश धर्म का ब्रीद उजागर
मधुर धुन में मगन हो गाएं

कवि 'रवि'