Monday, 14 November 2022

अजर अमर सनातन संस्कृती

सनातन धर्म आणि संस्कृती ला अंत नाही ह्याला कारण ज्ञानाचा अमोघ प्रवाह ह्या संस्कृतीचा स्थायीभाव आहे. आद्यंतरहित अर्थात जिला आदि नाही आणि अंतही नाही अशी ही संस्कृती आहे. जगातील अस्तित्वात असलेल्या किंवा लोप पावलेल्या सगळ्या सभ्यता सनातन संस्कृतीच्या कालानुरूप विस्तारलेल्या शाखा आहेत ज्या कालपरत्वे उगवतात आणि नाशही पावतात. धर्म ह्या शब्दाचा अर्थ कोणत्याही सामाजिक मान्यतांचे प्रतिक नसून तो सर्वसमावेशक सत्कृत्यांना उद्धृत करणारा एक महासागराच्या आवाक्यासारखा व्यापक शब्द आहे. ज्ञानसागर हा तिन्ही लोक व्यापून सुद्धा शिल्लक उरतो आणि त्या मुळेच असे ज्ञानी करोडोंमध्ये अत्यल्प संख्येने जन्मतात आणि आपल्या ज्ञानशक्तीमुळे अजर अमर ठरतात. योग सामर्थ्याने त्रिकाल ज्ञानी बनलेल्या महा प्रचंड शक्तीशाली व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख आपण पुराण ग्रंथांचे अध्ययन करून अनुभवतोच. अनादिकालापासून त्यांचे चरित्र ह्या सनातन संस्कृतीच्या मार्तंडांनी मानवी सभ्यतेला अविरत प्रदान केलेले आहेत. असो! बालपणापासून ऐकिवात असलेल्या अशा अनेक गूढ, अनाकलनीय गोष्टी आधुनिक साधनांच्या सहाय्याने उकलल्या जात आहेत ही पुढील पिढ्यांचं जीवनमान अधिक ज्ञानमय करतील आणि सर्व जग पुन्हा सनातन संस्कृतीच्या धर्म मार्गाचं पाईक होईल असा माझा दृढ विश्वास आहे!जय श्रीराम 🙏

Sunday, 6 November 2022

मोक्ष

मोक्ष म्हणजे काय? प्रश्न तसा साधा सरळ आहे,'म' ला एक काना एक मात्रा=मो आणि क्षत्रियाचा क्ष, असा बनला मोक्ष! 
पण जेव्हा ह्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो तेंव्हा तेंव्हा त्याचे अंतरंग मला बाह्येंद्रिये बंद करून मन आणि मेंदू ची एकाग्रता केवळ आणि केवळ ह्या शब्दाभोवती केंद्रित करायला लावते. लाखो कदाचित असंख्य योनिंचा प्रवास करून आत्मा जेंव्हा मानवी शरीर धारण करतो, तेंव्हा त्याला शब्द स्वरूपी भांडवल मिळते ज्यायोगे, तो इहलोकीची उद्दिष्टे साध्य करतानाच पारलौकिकाची उद्दिष्टे सुद्धा सहज शक्य व्हावीत यासाठी ऐहिक, प्रापंचिक, अध्यात्मिक आणि पारमार्थिक कर्म करीत असतो. हे सगळं जगडव्याळ चालू असताना जी काही उपलब्धि होत असते तेंव्हाच आपल्या संचयनीत एक अनूभूती साठत असते आणि ती म्हणजे जडत्वाच्या प्रवाहातून सूक्ष्माच्या सान्निध्यात जाण्यासाठीची ओढ.
"मोक्ष म्हणजे काय" 
ऐहिकाच्या गती पासून, आसक्ती पासून मुक्ती म्हणजे मोक्ष. सदोदित अस्थिर राहणं हा जसा मनाचा धर्म आहे तसाच स्थिरचित्त राहणे हा मेंदूचा धर्म आहे. मन आणि मेंदू ह्या दोहोंमधील द्वंद्व म्हणजे विकार. विकारांचा पाश माणसाला मुक्ती पासून वंचित ठेवण्यास्तव हृदयाच्या अंतिम धडधडी पर्यंत धडपडत असतो. परंतु, बुद्धीवर अधिकार प्राप्त असलेली व्यक्तीमत्वे ह्या पाशाला भेदून परमार्थाची वाटचाल सहजपणे करू शकतात आणि परिणामी मोक्षाला प्राप्त करतात. 
"मोक्ष म्हणजे काय"
एखाद्या व्यक्तीकडून उसनी आणलेली वस्तू उपभोगताना सतत हे आपले नाही आणि म्हणूनच योग्य ती काळजी घेऊनच त्यक्त वृत्तीने ती वापरणे आणि मागणी आली असता जशी च्या तशी किंबहुना ती अधिकच सुशोभित करून परत करणे म्हणजे मोक्ष. आपल्याला लाभलेला जन्म ह्यावर आपला यत्किंचितही अधिकार नाही आणि ज्या शरीरात आपण पाहुणे म्हणून उपस्थित आहोत त्याचे चोचले पुरविणे हे आपल्याला बाध्य नाही ही भावना जागृत ठेवून जीवन कार्य करणे हा मोक्षाचा सोपान आहे. 
"मोक्ष म्हणजे काय"
जीवाला शिवामध्ये विलीन होण्यासाठी उपयुक्त कार्य करणे ही मोक्षाची उपलब्धि आहे. जन्मोजन्मीच्या पुण्याई द्वारे लाभलेल्या दुर्मिळ मनुष्य जन्माला सद्गतीला लावणे म्हणजे मोक्ष.
आणि अंती एवढेच की जीवंत पणीच सर्व संग परित्याग करून परमात्म्याची अनूभूती साधून इहलोकीची यात्रा पूर्ण करणे म्हणजे "मोक्ष"
कवि 'रवि'
(रविंद्र सरदेशमुख)

सज्जनगड

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रीया धरावी 
मना चंदनाचे परी त्वां झिजावे, परी अंतरी सज्जना नीववावे
वरील चार ओळींमधून समर्थ रामदास स्वामींनी जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रधर्म अंतरी कसा जागृत ठेवावा हे देखील चार ओळींमधून विषद केले आहे. 
बलोपासना नित्य नेमे करावी, बळे आगळे कीर्ति विश्वीं भरावी
जिथे शक्ती युक्ती तथा ईशभक्ती, तिथेची मिळे देह देशासी मुक्ती सामान्य जनांकडून सुद्धा राष्ट्र आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर अशा रीतीने जीवनमान असावे ह्याची शिकवण तीन शतकांपूर्वी स्थापित करणारे महान द्रष्टा स्वामी समर्थ रामदास आणि त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे छत्रपती शिवाजी महाराज दोघेही विलक्षण. जय श्रीराम

Tuesday, 1 November 2022

जागतिक शाकाहार दिवस

"वर्ल्ड वेगन डे" ही संज्ञा आपणा भारतीयांना फारशी आकर्षक वाटणारी नसेल कदाचित पण लक्षणीय आणि चिंतनीय अवश्य आहे. 'एक नोव्हेंबर' हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून निर्धारित केल्या जाण्याचं तसं काही विशेष कारण नाही परंतु ह्या विषयाला सुप्रसारित करण्यासाठी एका दिवसाचं निमित्त असणं गरजेचं होतं. इसवी सनाच्या १९४४ व्या साली 'लुई वालिस' ह्या ब्रिटिश नागरिकाने, जो तदनंतर ह्या संस्थेचा अध्यक्ष बनला, त्याने ह्या संस्थेची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोहळा करावयाचे ठरविले. त्या वेळी त्याला येवढेच ज्ञात होते की ही संस्था पन्नास वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात स्थापन झाली परंतु निश्चित तारीख मात्र माहीत नव्हती. तेंव्हा त्याने १ नोव्हेंबर हा दिवस निश्चित केला. वेगन किंवा व्हेगन ह्या शब्दाचा जन्म होऊन एव्हाना एक शतकाहून काळ लोटला आहे. ह्या शब्दाचा संपूर्ण मानव जातीवर प्रभाव मात्र अलिकडच्या काही दशकांत प्रकर्षाने दिसू लागला आहे. मुख्यतः मांसाहाराचा अतिरेक करणारी 'गोऱ्या लोकांची वस्ती केंद्रे' आता शाकाहार म्हणजे निरोगी स्वरूपात दीर्घ आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे हे मान्य करून स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. साहजिकच हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी त्यांना भारतीय उपखंडातील निरनिराळ्या शाकाहारी व्यंजनांची पाककृती आकर्षित करीत आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जीवन पद्धती सह वैचारिक दिशा देखील आकर्षित करीत आहेत. गेल्या काही वर्षांत आपण सहजपणे अनुभव करू शकतो की जगभर सनातन हिंदु जीवन पद्धतीचा अवलंब करण्याची प्रवृत्ती जोर धरत आहे आणि त्याद्वारे जीवनाकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची उत्सुकता वाढत चालली आहे. 
आशा करुयात येत्या काळात सगळं जग भारतीय सनातन हिंदु संस्कृतीचा अभ्यास करून आयुष्य सुखी, सुसंस्कृत आणि सुदृढ व्हावे यासाठी प्रयत्नरत राहील. रा स्व संघाच्या शांति मंत्राच्या दैनंदिन उच्चार करण्या मागचं उद्दिष्ट हेच तर आहे.
"सर्वे भवन्तु सुखीन:, सर्वे संतु निरामय:, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दु:खभाग्भवेत"
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख