मयतीचा इवेंट
मयतीचा इव्हेण्ट
पलिकडच्या सदारांच्या घरी मयत झाली
वयस्कर होते अशी वार्ता पसरली
इंग्रजी सत्तेविरुद्ध म्हणे लढ्यात शिक्षा झाली
स्वातंत्र्य संग्राम सैनिक अशी पदवी मिळाली
आजाराची तशी सुतराम शक्यता नव्हती
कारण संघर्ष करण्याचीच त्यांची वृत्ती होती
कालच माळ्याशी त्यांची बाचाबाची झाली
अंगणातील माती त्यांनी अख्खी खोदून दाखवली
माळी म्हंटला काका आता हे लयंच झालं
पोटावर मारून माझ्या तुम्ही काय मिळवलं
हिशोब चुकता घेऊन माळी निघता झाला
संध्याकाळी सदारांचा अन मुलाचा राडा झाला
सकाळी मॉर्निंग वॉक वरच्या कुत्र्याने
कुंपणावर शंका केली
कुत्र्या मागे धावून धावून त्यांची पुरेवाट झाली
भूक लागली म्हणून एक चपाती खावी वाटली
तशी काकूंनी त्यांची खरडपट्टी काढली
घर सॅनिटोरियम सारखं त्यांना भासलं
बायकोला खडकावं ह्या विचारानं ग्रासलं
पोचले हाटेलात आणि मागितला वडापाव
मालक म्हटला वो छोडके और कुछ खाव
भडकल्या माथ्यानं काका स्टेशन वर आले
सिएसटीच्या गाडीची वाट बघू लागले
क्षणभरात एक अनाउन्समेंट झाली
सीएसटीकडे जाणारी गाडीच रद्द झाली
थकलेल्या तनमनाने सदार घरी आले
डायनिंग टेबलकडे बघून मन आणखी खट्टू झाले
भुकेपोटी उपास देवा कसा परवडणार
झोपेचे लचके आता मन कुरतडणार
चिंतेपोटी बराच वेळ झोप नाही आली
अशा प्रसंगी स्वप्नात मात्र यमाची भेट झाली
यम म्हंटला 'स्वातंत्र्य वीरा' आता पुरे झाले
संदेश घेऊन माझा बघ यमदूत ही निघाले
होकार देशील तर त्यांना थांबवणार नाही
पण इच्छा नसेल तुझी तर नेणारही नाही
त्रासलेले सदार यमाला चटकन बोलते झाले
पुरे झाले यमा आता जीणे उणे झाले
येतो दूतांसंगे आता चिंता नाही उरली
जगून जगून जगण्याची हौस पुरती झाली
दिवस निघताच आज कुणाला गडबड नाही दिसली
तशी सदारांच्या खोलीकडे सगळ्यांची नजर वळली
अंथरुणात सदारांना कधी कुणीच नव्हते बघितले
शांत पहुडलेले बघून अवघेच घाबरले
अनुभवी सदारीण बाईंनी श्वास तपासला
आणि एकदम जोरात हंबरडा फोडला
काय झालं आहे हे सगळ्यांनाच उमगलं
मोबाईल वर वृत्त घराघरात धडकलं
गोतावळा मोठा सदारांचा अवघेच जमा होणार
ओघानेच सगळ्यांची वास्तपुस्त होणार
कॅटरर मंडपवाला प्रायोरिटी ने ठरले
वृत्त सांगण्यासाठी अनाउंसर ही आले
हार फुले गोवऱ्या मडकी बांबू आणि सोवळे
भटजींनी लिहून दिले ते सारे साहित्य आले
वार्डातील नेते मंडळी पर्यंत जशी वार्ता गेली
स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी अंत्ययात्रा ही ठरवली
बॅंड पथक ढोल पथक लेझीम वाले आले
फटाक्यांच्या आतिशीवरही एकमत झाले
यात्रेचा मार्ग मोकळा केला गेला
पोलिसांनी बॅरिकेड्स ने रस्ता अडविला
स्मशानात पाहुण्यांच्या सभेची तयारी झाली
रेंगाळत रेंगाळत यात्रा स्मशानात आली
स्नानादिक सगळे विधी पूर्ण केले
आणि मुलाने सदारांच्या चितेला पंचाग्नि दिले
लाटा उमटल्या तशी शोकसभा सुरू झाली
ज्येष्ठ श्रेष्ठांसह इतरांचीही वर्णी लागली
सदारांच्या अंगीचे सगळे गुण वर्णन झाले
स्वभावातील विविध पैलू ही उलगडले
अधूनमधून सगळ्यांपर्यंत क्षुधा शांति पोचली
शोकमग्न मने त्याने शांत झाली
विसर्जनाच्या क्षणी मुलगा पुढे आला
सर्वांचा त्याने आवर्जून आभार व्यक्त केला
हळूहळू गर्दी ची निरवानिरव झाली
सदारांची मंडळी स्थिर स्थावर झाली
इव्हेंट मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टर बील घेऊन आला
लाखात खर्च पाहून सदारांचा आत्मा विव्हळला
एका चपातीच्या त्राग्याने एवढे रामायण घडवले
आधुनिक समाजाने मरणाला इव्हेंट घडवले
कवि 'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home