प्रतिक्षा
आज,
जरी असा निष्पर्ण झालोय मी
बहरल्या फांद्यांवर, डेरेदार यष्टीवर
कधी
तू भाळली होतीस
तुला वाटायचे
मला काही कळतच नाही
आणि त्या धुंदल्या अवस्थेत
एकटक
तू मला न्याहाळत राहायचीस
मीही कधी तुझा दृष्टीभ्रम मोडला नाही
आणि
स्तब्ध, निर्विकारपणे तुझ्या डोळ्यातील भाव टिपत राहायचो
तुला आनंद देण्यातच
वाटायचे मला सुख
पण का कुणास ठाऊक
तू मला पुतळयागत मानले
मनसोक्त माझ्यासवे राहूनही
तू अचानक परकी झालीस
माझ्या जखमांचे व्रण अजूनही पाझरताहेत मूक माझे सर्व अवयव अंतरी ओरडताहेत ह्या अशा वठलेल्या अवस्थेत
तू पुन्हा समोर आलीस
काष्वठत यष्टी मध्ये विजेची लहर दौडून गेली अजूनही
त्याच स्थानी अगदी तसाच
पण कांहीसा लवलेला मी
तुझी प्रतीक्षा करतो आहे
तुझी प्रतीक्षा करतो आहे
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home