जय श्रीराम,
मित्रांनो आजच्या दिवशी भारतीय संहितेनुसार आपण शिक्षक दिन साजरा करतो असं ऐकिवात आहे. खरं सांगायचं तर ही एक केवळ प्रासंगिक आठवण तेवढी राहिली आहे, ज्या गोष्टीचा उत्सव व्हायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही क्षणिक मानतो आणि नसत्या ढोंग ढकोसल्या मध्ये शताब्दी, दशाब्दी किंवा स्मृति प्रित्यर्थ संपूर्ण वर्षभर बोंबाबोंब करीत असतो. माझा कटाक्ष अर्थातच तथाकथित ढोंगी मस्तराम महात्म्यांच्या बाबतीत आहे ज्यांनी स्वस्तुतीच्या आणि वृथाभिमानाच्या नादात आपल्या ह्या अद्भुत महान देशाचं वाटोळं करून टाकलं आहे. आश्चर्य म्हणजे आजही आम्ही त्यांना वंद्य मानतो, पूज्य मानतो. त्यांच्या तस्वीरी आजही आमच्या संसदेमध्ये सन्मान प्राप्त ठिकाणी विराजमान आहेत. असो!
मुळात विषय आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा. विडंबना अशी की ह्या प्रसंगाला गुगल मुळे आपल्या पर्यंत पोचावे लागते, आपली कुंभकर्णी झोप तशी आताशा कुठल्याही सांस्कृतिक विषयासाठी उघडत नाही.
भारतातील ज्ञान सरितेला प्रवाहित ठेवण्यामध्ये आमच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं पांडित्य जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून सरकारने ह्या दिनाला शिक्षक दिन म्हणून घोषित केले, मात्र ह्या दिनाला विशेष महत्त्व देणं काही सरकारला जमलं नाही.
वर्तमान काळात शिक्षण आणि शिक्षक ह्या दोन्ही संथा वाणिज्यिक विषय झालेल्या आहेत, पैशाने विकत घ्याव्या लागतात, आजच्या भाषेत बिकाऊ माल झालेल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून प्राप्त केलेलं ज्ञान मग स्वतः चा बाजार मांडून सामान्यांच्या जीवनाला प्रभावित करत करत, बहुतांश प्रसंगी सामान्यांना उध्वस्त करून आपल्या ज्ञानाचा अंधार जगभर पसरवीत आहेत. बिकाऊ डॉक्टर आणि बिकाऊ वकील हे दोघेही आपापल्या अशीलांचं किती अनिर्बंध पणाने शोषण करतात हे प्रत्येकाने अनुभवलेले आहे. शिक्षण क्षेत्रही बाजारबुणग्यांनी व्यापून टाकले आहे. भ्रष्टाचार हा सर्वमान्य झाला असून शिष्टाचाराचा भाग बनला आहे.
शिक्षक दिन सार्थक करायचा असेल तर वैचारिक पातळी आधी स्वच्छ करावी लागेल, भ्रष्ट प्रथा आणि त्यांचे जनक, पुरस्कर्ते ह्यांचा बंदोबस्त करावा लागेल. अंती माझ्या मनातील गुरुंचे स्थान व्यक्त करताना एवढेच म्हणेन की
" गुरुर्ब्रह्मा: गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः"🙏🌹🙏
कवि 'रवि'