मला उमगलेले नेताजी
जय श्रीराम
स्वतंत्र भारतातील राष्ट्रनिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आधुनिक भारताचे शिल्पकार अशी आजची तरुण पिढी, अशा सर्वांसमोर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आयुष्य खपविले अशा वीरांचे अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी थोडक्यात कथन करण्याची संधी मला मिळावी ह्यातच मी धन्यता मानतो. संघ स्वयंसेवकांच्या समक्ष बोलताना शिस्तीचे आयाम पाळावेच लागतात ह्याची जाण ठेवून मी शब्दांची निवड करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे, काही चुका झाल्यास आपणा सर्वांनी समजून घ्यावे ही विनंती आहे.नेताजी- स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तिमत्वांपैकी असं एक नाव आहे की आजही त्यांच्या चरित्राचं गारुड एतद्देशीय नवतरुणांवर प्रचंड आहे, असं वाटतं आज पुन्हा जर कां नेताजी समोर येऊन ह्या तरुणांना आवाहन करतील की "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" तर ह्या नौजवान भारतातील एकूण एक तरुण देशासाठी सर्वस्व दान करायला धावून जाईल. रक्त ही देईल आणि मायभूमी ला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक ही घडवील. अर्थात आता आजादी हा काही परकियांकडून मिळण्याचा विषय राहिला नाही परंतु परकियांनी लादलेल्या वैचारिक जोखडातून आपण अजून पर्यंत सुटका करून घेऊ शकलो नाही.मला वाटतं नेताजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला असावा. कारण की त्यांच्या अनेक कृतीतून छत्रपती शिवराय दिसतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेताजींचं बुद्धी कौशल्य प्रखरपणे दिसून येते. आपल्या पैकी बहुतेकांनी त्यांचं चरित्र अभ्यासलं असेल, अनेकांनी व्हिडिओ मार्फत त्यांना अनुभवलं असेल. त्यामुळे त्या पैलूंवर बोलण्याऐवजी त्यांनी अवलंबिलेली राष्ट्रीय जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेलं अत्युच्च दर्जाचं नियोजन हे विशिष्ट बिंदू मला महत्वाचे वाटतात.ज्या इंडियन नॅशनल काँग्रेस चे ते सदस्य होते, त्या काॅंग्रेस मधील शीर्ष नेतृत्वाने त्यांचा कायम उपमर्द केला, त्यांच्या विरोधात वेळप्रसंगी शत्रूशी संगनमत करून त्यांना नामोहरम करण्यासाठी कुटिल कारस्थाने केलीत त्याच कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील निवडून आले, ह्यातून त्यांची जीद्द आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचं सातत्य उल्लेखनीय आहे. जगातील त्या काळातील सर्वोच्च शक्तिकेंद्रे देखील नेताजी ह्याचं नेतृत्व मानीत असत ह्याची उदाहरणे स्वातंत्र्याच्या इतिहासात नमूद आहेत. अत्यंत क्रूर हुकुमशहा म्हणून ज्या हिटलरला जग ओळखते, त्या हिटलरला सुद्धा प्रसंगी त्याच्याच गडामध्ये नडायला मागेपुढे न पाहणाऱ्या नेताजींना आठवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेब भेटीचं उदाहरण हुबेहूब डोळ्यासमोर येते. स्वातंत्र्य वीर सावरकरांचं आराध्य देखील शिवाजी महाराज च होते हे याठिकाणी प्रकर्षानं नमूद करावेसे वाटते. बदलत्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा नेताजींना आठवताना मला देशाचे विद्यमान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन राष्ट्र हिताशी किती जवळीक साधून आहे, ते प्रकर्षाने जाणवते. आणि पुढील काळासाठी संघाच्या ह्या स्वयंसेवकाची अर्थात मोदीजींची राष्ट्र उभारणीसाठी ची आंतरिक तळमळ दिसून येते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी माझ्या सारख्याने आकलन करणं आणि त्यावर भाष्य करणं हे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्या सारखं आहे. त्यांच्या बद्दल बोलताना भावना अनावर होतात त्यामुळे काही चुका झाल्या असतील तरआपण सर्व सुजाण मंडळी मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी अशी विनंती करतो.जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जयकवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home