Thursday, 10 February 2022

तुका म्हणे ऐशा नरा

तुका म्हणे ऐशा नरा...मोजुनी माराव्या पैजारा
वरील वाक्य संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण एका ओळीत बराच अर्थ गर्भित आहे म्हणून त्याचा उपयोग केला आहे एवढेच.
तर मुद्दा असा आहे की वर्तमान काळात महाराष्ट्र देशी "त्रिपाद शासन व्यवस्था" डोलकाठी वर स्वार होऊन यशस्वी पणाचा आव आणित आहे. इतुके नसे थोडके म्हणून वरतून त्यांचे 'बोलके भांडे' मनातील मांडे सकाळी सकाळी अवतरणाऱ्या डोमकावळा वृत्तीच्या 'भ्रमित वृत्तशल्यकारांसमोर' वाजण्यासाठी तत्पर असतात. आणि ते शल्यकार बरळलेल्या प्रत्येक वाक्याची सोईस्कर चिरफाड करून तुम्हां आम्हाला पेश करतात. वरतून आव असा की तत्वज्ञान सांगताहेत. असो! 
आम्ही असे ऐकले आहे की रावतांच्या कोणातरी एकाला इडी झोंबलीय आणि त्याचा शूळ रावतांच्या कोणातरी दुसऱ्याला उठलाय. झाले,मग काय पहाटे अवतरलेल्या डोमकावळ्यांच्या चोचीत पडला की बातमीचा तुकडा. म्हणे इडी नावाची इंगळी निरपराधांची झाडाझडती घेत आहे, ह्यात शुद्ध राजकारण आहे, हे बरे नव्हे वगैरे वगैरे. 
सत्ताधारी होणं म्हणजे जणू काही सर्व गुन्हे माफ ठरणं असं एक समीकरण "खानग्रेसी" सरकारांनी स्थापित करून ठेवले होते. हे सत्य असलं तरी आता शुद्धीकरण मोहिमेत ती अडगळ दूर झालीय आणि भल्याभल्यांची नर्तनकला विफल ठरली आहे. तेंव्हा हे संजया धृतराष्ट्रासंगतीचा तुझा हा खेळ रणात हरलेल्या दुर्योधनाला भूमिगत व्हायला आणि तुला अस्तंगत व्हायला कारणीभूत ठरणारा आहे. 
विलाप करीत बसण्या व्यतिरिक्त आता कोणतीही शिष्टाई उपयोगी पडणार नाही. पेराल ते उगवेल ह्या उक्तीप्रमाणे आता फळं चाखावीच लागणार आहेत. ह्या जन्मीचं ह्या जन्मीच फेडावं लागणार अशी ह्या एकविसाव्या शतकाची करणी आहे. 
अंती इतुकेच सांगणे आहे की बेडुक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, आणि सरड्याच्या शापाने सिंह मरत नाही. आता पश्चात्ताप किंवा प्रायश्चित्त ह्यासाठी एकच डेस्टिनेशन आहे, ते म्हणजे ह्या सदा वत्सल मातृभूमी वरील कोणते तरी कारागृह!! तथास्तु.. तथास्तु
कवि 'रवि'


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home