ढोंगी बगळा आणि परोपकारी खेकडा
कृष्ण शास्त्री चिपळूणकरांची बकान्योक्ती प्रसिद्ध आहे तीचा मतितार्थ असा:
एका जंगलात एक तलाव होता आणि त्या तलावात सुंदर सुंदर मासे अति आनंदाने विहार करीत होते. सद्गुणांनी युक्त अशी ती मासे मंडळी आस्थावान होती. दु:खाची व्याख्या देखील त्यांना ठाऊक नव्हती. अशा ठिकाणी एक शुभ्र धवल बगळा फिरत फिरत पोचला. त्याला त्या सुंदर तलावातील माश्यांना आनंदाने विहार करताना बघून खूप ईर्षा उत्पन्न झाली आणि त्यांना खाण्यासाठी तो लालचावला. पण त्यांची एकी बघून त्याला प्रश्न पडला की ह्यांना खावे तरी कसे?
बराच विचार करून त्याने एक युक्ती शोधून काढली आणि आपल्या कामाला लागला.
भल्या पहाटे तळ्यामध्ये एक साधू एका पायावर तपश्चर्या करीत आहे असे दिसताच संपूर्ण तळ्यात ती वार्ता पसरली आणि तळ्यातील जीव त्याचं दर्शन घेण्यासाठी पोहचू लागली. बगळा एकाग्रतेने सर्वांना नकळत परिस्थिती न्याहाळत होता. एक दिवस गेला... दोन दिवस गेले, असे करता करता तळ्यातील जीवांची खात्री पटली की हा बगळा महान तपस्वी आहे आणि निर्धास्त होऊन ते त्याचे भोवती निश्चिंतपणे फिरू लागले.
हां हां म्हणता तळ्यातील माशांना हे ध्यानात येऊ लागले की आपली संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे आणि हा चिंतेचा विषय आहे.
त्यांनी ह्या करिता सर्व सुजाण जलचर प्राण्यांची सभा बोलावली आणि निष्कर्ष द्यावा अशी विनंती केली. शोधक दृष्टी असलेल्या खेकड्याने नेमके काय होते आहे ते शोधले आणि सभे समक्ष हे स्पष्ट केले की हा बगळा धूर्त आहे आणि मासे खावून फस्त करीत आहे. मी पाण्याबाहेर पलीकडे माश्यांच्या हाडांची रास बघून आलो आहे.
झाले! माश्यांमध्ये एकच हाहाकार माजला. सर्व भयभीत झाली.पण काय तोडगा काढावा ते कुणाला कळेना. ह्या बगळ्याचा कायम काटा काढला जावा ह्यावर एकमत झाले पण तोडगा सुचेना. काही क्षण विचार करून कासवाने एक प्रस्ताव मांडला. कासव म्हणाले, ह्या ढोंग्याचा काटा काढायचा असेल तर खेकड्याला मी सुचवतो ते त्याने करावे. थोडी जोखीम आहे पण हे शक्य आहे. खेकडा तयार झाला आणि कासवाच्या युक्ती वर अंमल करायचे ठरले.
दुसरे दिवशी बगळ्याभोवती एकही मासा फिरकला नाही, बगळा आश्चर्य चकित झाला. त्याच्या मनात शंका उद्भवली की काय माझे ढोंग ह्या माशांना कळले की काय? सलग तीन चार दिवस असेच घडले तेव्हा न राहवून त्याने शेजारी फिरत असलेल्या खेकड्याला विचारणा केली. चतुर खेकड्याने आढेवेढे घेत त्याला सांगितले की तळ्यातील माशांची घटलेली संख्या त्यांच्या लक्षात आली आहे आणि त्यांना तुझ्या वर संशय आला आहे. ते ऐकून बगळा गडबडला खरा पण क्षणात स्वतः ला सावरून त्याला म्हणाला, मित्रा! होय हे खरे आहे की ह्या तळ्यातील मासे कमी होण्यास मीच कारणीभूत आहे. परंतु, मी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार दुसऱ्या ह्या तळ्याहूनही सुंदर तळ्यामध्ये जाण्यासाठी मदत केली आहे आणि ते तेथे अत्यानंदाने रहात आहेत. हे ऐकून खेकड्याने संमती दर्शवली आणि मी इतर सर्वांना हे सांगून त्यांचं शंका निरसन करतो असे सांगून निघून गेला.
पुन्हा सगळे प्राणी एकत्र झाले आणि खेकड्याने वृत्तांत सांगितला. सर्वानुमते असे ठरले की उद्या आपण सगळे मिळून बगळ्या जवळ जाऊ आणि ह्याची शहानिशा करू. ठरल्याप्रमाणे सगळे बगळ्या जवळ पोचले आणि त्याने खेकड्याला जे सांगितले ते खरे कां अशी विचारणा केली. बगळ्याने चेहऱ्यावर सात्विक भाव आणून मोठ्या आविर्भावात त्यांना सांगितले की होय हे खरे आहे. खात्री करायची असल्यास मी उद्या खेकड्याला सोबत घेऊन जाईन आणि दाखवून आणिन. त्यालाही त्या रम्य ठिकाणी रहायला खूप आवडेल अशी पुस्तीही जोडली. सर्वांनी त्यास अनुमती दिली.
खेकडा बरोबर समजला की हा माझा ही घात करायला बघतोय. त्याने आपल्या मनात एक योजना आखली आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बगळ्या सोबत तिकडे जाण्यासाठी पोचला. तळ्यातील इतर प्राणी त्यांना जाताना बघायला जमलेच होते.
बगळ्याने मोठ्या उत्साहात खेकड्याला आपल्या पाठीवर बसवले आणि उडत उडत निघाला. तळ्यापासून दूर पोचल्या वर त्याने खेकड्याला खाली पाडायचा प्रयत्न सुरू केला. हे कळताच खेकडा त्याला म्हणाला स्वामीजी सावकाश! नाहीतर मी खाली पडेन. उन्मत्त बगळा गर्वाने त्याला म्हणाला 'अरे मूर्खा, मी तुला इतक्या उंचीवर आणलेच एवढ्यासाठी आहे की तुला फेकून देईन आणि तुला संपवून तळ्याकडे परत जाईन. तळ्यातील प्राण्यांना सांगेन की खेकडा तिकडेच रमला. आणि अशा रितीने मी सगळ्या माशांचा फडशा पाडीन.
येवढे ऐकताच खेकड्याने त्याच्या गळ्यात आपल्या नांग्या घुसवल्या. बगळा विव्हळू लागला तसा खेकडा उद्गारला अरे धूर्ता तुझं कपट सगळ्यांनी ओळखलं आहे आणि त्या योजनेनुसारच मी तुझा अंत करण्यासाठी तुझ्या सोबत आलो आहे. बगळा होलपटत जमिनीवर पडला आणि गतप्राण झाला.
तात्पर्य: ढोंग काही काळापुरते यशस्वी होते पण सार्वकालिक नसते. ज्ञानियांच्या योगे कपटियांचा अंत होतोच.
मूळ बकान्योक्ति ही अशी आहे:-
उभा राहे एके चरणी धरणी ते धरुनिया
तपश्चर्या वाटे करित जणू डोळे मिटुनिया
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेची ठकती
परि ज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती
वर्तमानातील बगळे कोण, मासे कोण आणि त्यांचा तारणहार खेकडा कोण हे समजावयास आपण सगळे सूज्ञ आहात.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home