भय इथले संपत नाही
जोवर हिंदु हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जीवंत होते तोवर भाजपा-सेना यांची दीर्घकालीन युती देखील जीवंत होती. त्यांच्या पश्चात हळूहळू स्वार्थी लोकांची कारस्थाने सुरू झालीत आणि त्याचे रुपांतर शेवटी युती तुटण्यात झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने अतीशय स्वच्छ आणि पारदर्शक असा लोकहितपूरक कारभार पाच वर्षे चालविला. सत्ता ही जनसेवेचं व्रत म्हणून कशी वापरावी याचे आदर्श उदाहरण घालून दिले. यामुळे सत्तेचा उपभोग घेण्यास आसुसलेल्या मंडळींच्या पोटात शूळ निर्माण झाला. आणि युती हवी पण देवेंद्र मुख्यमंत्री नको असा सूर जोर धरू लागला. पण भाजपा कार्यकारिणी ने त्याला भीक घातली नाही. देवेंद्राने पक्षातील स्थानिक सहकाऱ्यांशी चर्चा करून आपण युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशी सूचना केंद्रीय कार्यकारिणीला केली. परंतु आपलेच काही दगाफटका करतील की काय ह्या शंकेने वरिष्ठांनी युती कायम ठेवीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक पार पडली, युतीला बहुमत प्राप्त झाले. अर्थात महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला. पण, अनपेक्षितपणे सेनेने धोका दिला. लोकशाही नियमानुसार ज्येष्ठ पक्षाला मुख्यमंत्री पद देण्याचा नैसर्गिक अधिकार डावलून सेनेचा मुख्यमंत्री झाला तरच युती कायम अथवा नाही असा निर्णय घेतला.
परिणामी युती तुटली आणि जनतेने नाकारलेल्या तिय्यम, चौयम पक्षांसोबत अभद्र युती करून उद्धव ठाकरे यांनी आपली हौस भागवून घेतली. ह्या तिकडीचा हनीमून देखील पार पडला नाही, की मंत्रीमंडळातील जो तो उन्मत्त होऊ लागला. शासन कसे करावे ह्याचा कवडीचाही अनुभव नसल्याने उद्धवजींना पवार काकांच्या कुबड्या शिवाय पर्याय राहिला नाही.
महाराष्ट्रातील सत्ता केंद्र अर्थातच काकांच्या दिशेने प्रवाहित झाले आणि उद्धवजींना मातब्बर राजकारण्यांनी "मनमोहन" बनवून उभा धिंगाणा घालत सगळ्याच क्षेत्रांत घाण करून ठेवली. सेनेतील काही नेते तर स्वतः ला प्रॉक्सी मुख्यमंत्री मानून किंवा सनदप्राप्त अधिकारी समजून विचित्र निर्णय घेऊ लागले, त्यातून अभूतपूर्व भ्रष्टाचार बोकाळला आणि अराजक माजले.
ह्या परीस्थितीवर अंकुश ठेवण्यात मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत हे अवघा महाराष्ट्र अनुभवतो आहे. सुस्थितीतील हा महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे ह्या साठी जनता चिंताग्रस्त आहे. सत्तेतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक भानगडी उपस्थित होत आहेत आणि त्या अनुषंगाने सी बी आय, एन आय ए, ई डी किंवा न्यायालय ह्या संस्था सक्रिय झाल्या आहेत. एक एक भ्रष्ट राजकारणी न्यायालयाच्या कचाट्यात सापडत चालला आहे आणि शिक्षेस पात्र देखील ठरत आहे. राज्याची आता काय हालत झालीय हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे कळून चुकले आहे.
आणि म्हणूनच "भय इथले संपत नाही"
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home