दादोजी कोंडदेव
छत्रपती शिवराय आठवताच प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाचा ऊर भरून येतो हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. आणि आजच्या बदलत्या युगात तर छत्रपती शिवराय यांचं चरित्र हा जागतिक पाठ्यक्रमाचा विषय झालेला आहे. शिवरायांच्या ह्या उत्तुंग यशामध्ये अर्थातच त्यांच्या असंख्य ज्ञात किंवा अज्ञात योगदान आणि बलिदान सामावलेलं आहे. उदाहरणे अनेक आहेत, एका अर्थाने असेही म्हणता येईल की त्या काळी शिवरायांचा स्वराज्याचा लढा ही एक सांघिक चळवळ बनली होती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार त्यात सामील होता.
शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यास ज्या प्रमुख जनांचं लाभलं त्यात ज्या प्रमाणे त्यांचे पिता शहाजीराजे आणि माता जिजाऊ साहेब आहेत, तद्वतच दादोजी कोंडदेव यांचा प्रामुख्याने उल्लेख झालेला आपल्याला पहावयास मिळतो.
बहुधा जन्मापासूनच शिवरायांना दादोजींचं सान्निध्य लाभलं. बालपणातच शिवबांना हिंदु संस्कृती, आचार विचार, धर्मग्रंथे, "शस्त्राचार आणि शास्त्राचार" ह्याचं शिक्षण जिजाऊ आणि दादोजी ह्यांनी प्रभावीपणे दिले, ज्या कारणे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. दादोजीं विषयी इतिहासातील नोंदी अल्प असल्या तरी त्यांचं कर्तृत्व ते 'शिवरायांचे गुरू' होते येवढ्या एक वाक्यातून साकार होते.
शिवरायांच्या काळात असे अनेक अनाम वीर आहेत की ज्यांची फारशी दखल तत्कालीन इतिहासकारांनी घेतलेली दिसत नाही. असो!
आपल्या प्रौढ वयातील साधारण १६ वर्षे दादोजी हे शिवरायांच्या साथ संगतीत होते. म्हणजेच शिवरायांच्या संगोपन काळात त्यांना दादोजींचा सतत सहवास लाभला आहे असे दिसते. पुढे तोरण्यावरील शिवरायांची स्वारी मात्र दादोजींना शिवबाच्या काळजीपोटी मान्य नव्हती, असाही उल्लेख इतिहासात आढळतो. वात्सल्यापोटी कुणाही सुहृद व्यक्तीला तसे वाटावे हे स्वाभाविक आहे. त्या प्रसंगा नंतर दादोजींचा कार्यकाळ फारसा उल्लेखित नाही. त्यांचा मृत्यू वयाच्या ७२ व्या वर्षी झाला अशी नोंद आहे.
अलीकडच्या काळात अविचारी वृत्तीने काही आक्रस्ताळी मंडळी स्वराज्य उभारणीतील दादोजींचं समर्पण आणि योगदान नाकारित आहेत ही खेदाची बाब आहे.
"जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण| ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार"
ह्या संत तुकाराम महाराजांच्या ओवीतील दोन ओळी दादोजींच्या चरित्राला चपखल बसतात. येवढे बोलून मी माझे कथन पूर्ण करतो.
कवि'रवि'

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home