Wednesday, 24 May 2023

सावरकर जयंती आणि संसद भवनाचे उद्घाटन

नवीन संसद भवनाचे उद्घाटन आणि राजकारण्यांची स्पृश्यास्पृश्यता:-
स्वातंत्र्य पूर्व काळातील इंग्रजी सत्तेच्या कटु स्मृतींना मूठमाती देऊन सत्यार्थाने नवा भारत स्थापित करण्याच्या जिद्दीतून जगनायक विद्यमान भारतीय पंतप्रधान परमादरणीय भाई नरेंद्र दामोदरदास जी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. अशाच महत्वपूर्ण निर्णयांपैकी एक म्हणजे अत्याधुनिक पद्धतीने आणि पुढील अनेक दशकांचा विचार करून बांधण्यात आलेले नवीन संसद भवन. दिनांक २८ मे २०२३ रोजी ह्या संसद भवनाचे उद्घाटन मोदीजींच्या हस्ते होणार आहे आणि तो दिवस निवडताना तो प्रसंग अविस्मरणीय कसा होईल याकडे मोठ्या विचारपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. ह्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांना क्रांतिसूर्य म्हणून ओळखले जाते अशा महान क्रांतिकारक विनायक दामोदर उर्फ क्रांतिवीर सावरकर ह्यांचा हा जयंती दिन आहे मित्रांनो.
१९४७ च्या काळात संपूर्ण स्वातंत्र्याच्या एकमेव उद्देशाने झपाटलेल्या भारतीयांना देशातील इतर विरोधी अंतर्प्रवाह कदाचित दिसू शकले नसावेत ज्या कारणे त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसी नेतृत्वाने घेतलेल्या सर्वच निर्णयांना मूक संमती दिली. परिणामी, अशा अनेक समाजविघातक गोष्टी स्थापित झाल्या ज्यांचे दुष्परिणाम आम्ही पुढील अनंत काळापर्यंत भोगणार आहोत. हे येथे नमूद करण्याचा मुख्य उद्देश असा की त्या काळी ह्या देशाला अत्युत्तम शासन प्रणाली देवू शकतील असे महान नेते एकतर संपविले गेले किंवा ते अज्ञातवासात आयुष्य जगण्यास बाध्य केले गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत.
संसद भवनाचे उद्घाटन होत असताना आजही त्या असुयेने प्रेरित असलेल्या लोकशाही विघातक, देशविघातक प्रवृत्ती उफाळून आलेल्या आहेत आणि आपापल्या परीने विरोधी सूर लावून कंठशोष करीत आहेत.
वर्ष २०१४ पासून नव्या भारताचा मंत्र देऊन जगनायक भारतीय पंतप्रधान मोदीजींनी जो विकासाचा धडाका लावलाय त्याने ह्या स्वार्थांध विकास विरोधी शक्तींचा पूरता फज्जा उडाला आहे. दिशाहीन झालेली ही मंडळी आपण समाजसेवक आहोत ह्या मूळ संकल्पनेलाच तिलांजली देऊन स्वतः ला ह्या देशाचे मालक असल्याचे मानत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून हे स्पष्ट दिसते आहे.
१९४७ पासून २०१४ पर्यंत भारतीय जनतेने अनेक स्थित्यंतरे घडवून आणली पण राष्ट्रविकासाचा उद्देश सफल होईल अशी कार्यपद्धती स्थापन करण्यात फार यश संपादन करता आले असा एकही पंतप्रधान झाला नाही.
२०१४ पासून म्हणजेच मोदीयुग आल्यापासून ह्या देशाने विकासाची जी भरभराट अनुभवली आहे तिने जगभरातील समृद्ध देश ही इतके प्रभावित झाले आहेत की आज नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या भारतीयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, होत आहे. 
सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांना आधुनिक भारताची सुशिक्षित युवा पिढी देखील हरप्रकारे सहाय्यक होते आहे ही सकारात्मक बाब अत्यंत महत्वाची आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी जगभरातील भारतीयांना शुभेच्छा देताना लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या ह्या पवित्र वास्तूत भारताचे भविष्य घडविण्यात आवश्यक ते सर्व निर्णय कार्यक्षम पणे घेतले जावेत अशी अपेक्षा आहे. 
दिशाहीन विरोधी पक्षनेत्यांना एकात्मिक भारतीय समाज घडविण्यासाठी सकारात्मक विचार दृष्टी प्राप्त होवो आणि संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारा आपला भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून अग्रेसर होवो अशी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना!
कवि 'रवि'

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home