संस्कार यज्ञ
धरतीच्या उत्थानापासून मानवी उत्क्रांतीच्या निरनिराळ्या दशा इतिहासाने नमूद करून ठेवल्या आहेत. स्थित्यंतरे हे मनुष्य प्राण्याला लाभलेले एक वरदानच म्हणावे लागेल. माणूस प्राण्या इतकी विविधता इतर कोणत्याही जीवांना प्राप्त झालेली आजतागायत कुठे नोंदल्या गेलेली नाही. वंश, परंपरा, समूह, विधीभिन्नता, भाषा, आचरण, पोशाख, दिनचर्या अशा अनेक कारणांमुळे माणसं भिन्नतेने नटलेली आहेत. हे कदाचित थोडे की काय म्हणून पृथ्वी वरील प्रत्येक माणूस आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात आणि ते टिकवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो.
आश्चर्याची बाब अशी की इतकं सगळं विचित्र असूनही माणूस प्राणी जगभरातील निरनिराळ्या मानवी समूहांशी निगडित आहे. पृथ्वीच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला बिनदिक्कतपणे प्रवास करणारा केवळ माणूस एकमेव प्राणी आहे. आपल्या ह्या अतार्किक कौशल्यामुळे माणसाला विकासाच्या आणि विरुद्धार्थी विनाशाच्या अनेक संकल्पना निर्माण करता आल्यात आणि त्या सगळ्यांवर पुन्हा नियंत्रण देखील ठेवता आले आहे. मानवी बुद्धीच्या ह्या असामान्यत्वाचा मूळ पाया म्हणजे "संस्कार".
आधुनिक जगात "प्लॅन-परफेक्ट-परफॉर्म" अशी त्रिसूत्री अपरिहार्य ठरली आहे. स्पर्धा टोकाची ठरली असताना शतप्रतिशत यश ही उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे. त्या साठी रोज निरनिराळ्या क्षेत्रात हजारो अनुसंधानकर्ते कार्यरत आहेत. प्रकल्पाची व्याप्ती कितीही असू देत, त्या मागे नियोजन अपरिहार्य झाले आहे आणि अशा नियोजनासाठी " रिसर्च अँड डेव्हलपमेंट" किंवा आर ऍन्ड डी असा वाक्प्रचार प्राथमिकतेचा विषय झाला आहे.
मित्रांनो, हा जो आर ऍन्ड डी चा प्रकार आहे त्यालाच वेदकालीन भाषेमध्ये 'संस्कार' असे संबोधले गेले आहे. हे संस्कार करीत असताना त्यातून एकाहून अधिक बाबींची निष्पत्ती होणे स्वाभाविक आहे आणि त्या अर्थाने पुन्हा पुन्हा संशोधन करीत राहणे ही पुढील अवस्था आहे.
मी ह्या लेखाचे शीर्षक "संस्कार यज्ञ" असे देण्यामागील गर्भितार्थ हाच आहे की मानव जातीला परमोत्कर्षाच्या अवस्थेची प्राप्ती करण्यासाठी अखंडितपणे संस्कार यज्ञामध्ये प्रयत्नांची आहुती देतच रहावी लागणार आहे.
ब्रह्मांडाच्या सकल ज्ञानाची महिती माणूस मिळविणार नाही तोपर्यंत हा संस्कार यज्ञ असाच तेवत राहणार आहे.
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home