राजकारणाची दशा आणि दिशा
सध्या देशभरातील डावे उजवे किंवा आणखी कोणत्याही श्रेणीत मोडणारे परंतु सत्तेपासून वंचित असलेले पक्ष एकत्रित पणे सत्ता हस्तगत करण्यासाठी यथा संभव प्रयत्न करीत आहेत. आपला देश हा अनेक कारणांनी जगातील इतर देश किंवा राजकारणी ह्यांना अनुकरणीय पायंडे घालून देण्यासाठी प्रसिद्ध होता. आणि म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्ती साठी जगातील सर्व लोकांनी भारतीय आदर्शाचा अवलंब केला. ७०-८० वर्षांच्या काळात आम्ही विकासाचा उद्देश बाळगून लोकशाही मार्गाने सरकारे निवडून देतो आहोत. त्यामुळे आमचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. गेल्या १० वर्षात पुरोगामी लोकशाही आघाडी किंवा 'एन डी ए', जी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने यशस्वी वाटचाल करीत आहे आणि देशाचा विकासरुपी रथ जगाने वाखाणावा अशा अत्यंत सकारात्मक पद्धतीने चालवीत आहे. ह्या आघाडीच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे हे जनता ओळखून आहे आणि त्यामुळे सरकार देखील महत्वाकांक्षी पाऊले उचलीत आहे. ह्या जवळपास दशकभरात एक बाब निश्चितच सिद्ध झाली आहे की भ्रष्टाचारावर नियंत्रण आणले तर देशाचा विकास निखालसपणे साधता येतो. पुढील आणखी काही वर्षांत पुरोगामी लोकशाही आघाडीचे हे सरकार देशाला जगातील अव्वल देश म्हणून ख्याती प्राप्त करून देतील असे चित्र प्रखरपणे जाणवू लागले आहे.
हे असे जर चालले तर आपले काय होणार! ह्या भयगंडाने पछाडलेले आणि अर्थातच भ्रष्ट प्रवृत्ती च्या नेतृत्वामुळे आजचे विरोधी पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. राजकारणात अकल्पनीय अशी भाबडी गणिते मांडून ही मूर्ख नेते मंडळी आपले समाधान करून घेऊ शकतील. पण जनतेला गणिताच्या आकड्यांप्रमाणे समजणे ही घोडचूक आहे हे लक्षात घेत नाहीत.
भाजपा देशातील ४० टक्के जनतेच्या मनातील पक्ष ठरला आहे आणि उर्वरित ६० टक्के जनता इतर विरोधी पक्षांच्या बाजूने मतदान करते म्हणून आपण एकत्र यावे आणि सत्ता हिसकावुन घ्यावी अशी सोपी निती, विरोधी पक्षनेते लावून धरत आहेत.
मला येथे नेमका हाच मुद्दा मांडून जनतेला प्रश्न विचारावासा वाटतो की काय ६० टक्के जनता हे समीकरण मान्य करते? तसे असेल तर पुन्हा निवडणूकीची वाट बघण्याचे कारण काय?
पी आय एल दाखल करा सुप्रीम कोर्टाला ह्या गणितान्वये निकाल लावू द्या आणि घ्या सरकारच्या चाव्या. आणि जर ते शक्य नाही, साध्य नाही तर मग ही फालतुगिरी बंद करून जनतेला मूर्ख समजण्याची प्रवृत्ती त्यागा.
अमेरिके मध्ये जवळपास द्विपक्षीय लढती होतात आणि कोणताही एक पक्ष ( मोटी शिवाय) बहुमताने सत्तेत असतो. आणि तरीही तेथील जनतेचे धृवीकरण कोणत्याही एका पक्षाला करणे जमलेले नाही. विकासात्मक वाटचाल आणि सुशासन ह्या प्रमुख बाबींचा परामर्श घेवूनच जनता आपल्या पसंतीचा पक्ष सत्तेवर आणते. त्यात कसूर होताच तेथील सत्ताधारी रसातळाला जातात हा इतिहास आहे.
तेंव्हा अशा एकमेकांना अजिबात पूरक नसलेल्या विचार सरणीच्या पक्षांनी एकत्र येऊन कितीही सोवळेपणाचा आव आणला तरी भारतीय जनता त्यांच्या ढोंगाला बळी पडणार नाही.
भारतीय जनतेने स्वीकृती द्यावी अशी करणी करावी लागेल. भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करून स्वच्छ चारित्र्याचे नेते निवडावे लागतील, अथकपणे समाजकार्य करून जनमानसात पत निर्माण करावी लागेल तेंव्हाच इतर पक्षांनी आपल्या साठी उज्वल भविष्याचा विचार करावा. अन्यथा २०२४ च्या निवडणुका नंतर अनेकांना मूठमाती मिळणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे.
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home