Sunday, 16 July 2023

शह आणि मात

जय श्रीराम,
काल अर्थात दिनांक १६/०७/२०२३ रोजी दिवस काका पुतण्या मधील भेटीच्या वार्तेने गाजला. १५ मिनिटांचा प्रसंग भारत भरातल्या बातमीदार समाजाला उत्तम मेजवानी देऊन गेला. आजकाल एक बरं आहे, मुद्रित माध्यमे आणि दृश्य माध्यमे यांच्या व्यतिरिक्त समाज माध्यमांची रेलचेल असल्याने एका बातमीला शेकडो कंगोरे शोधून त्यांचं विश्लेषण जो तो आपापल्या परीने करतो किंबहुना ते रंजक किंवा मसालेदार बनवून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सारख्या तथाकथित चिंतकांना मग गहन अभ्यासकाच्या भुमिकेत शिरून त्यावर खल करीत बसणे सहज सोपे होते. 
काल जे काही घडले त्यातून असा सूर काढण्यात आला की काका आणि पुतण्या यांच्या मध्ये दिलजमाई घडवून आणण्यासाठी दस्तुरखुद्द सुप्रिया ताईने पुढाकार घेऊन दादाला आमंत्रण घातले आणि यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्राचे स्थळ निश्चित केले. आता ताईचीच मध्यस्थी म्हंटल्यावर दादा तरी कसे नाकारू शकणार? झाले दादांनी देखील एकदम वारं शिरलेल्या वारू सारखी अवघ्या मदतनिसांचा ताफा घेऊन तिकडे धाव घेतली. काकांना म्हणे आश्चर्य चकित करण्यासाठी त्यांची वेळ न मागताच भेट घेतली. काय ते प्रेमाचं भरतं आणि काय तो मेलमिलाफ! सगळं कसं एकदम ओके.
झाली ऐतिहासिक क्षणाची निर्मिती झाली, भोंगे वाजवत आलेल्या गाड्या भोंगे वाजवत परतल्या! मागे राहिल्या त्या आठवणी आणि त्या अनुषंगाने जनित झालेले कवित्व.
मित्रांनो, बातमी म्हणावी तर खूप साधी, म्हणावी तर राजकारणाच्या दृष्टीने गोंधळ निर्माण करणारी अशी जाणवत राहिली. पण खरंच तसं होतं काय? मला आकलन झाले ते असे!.
ज्या दिवशी अजित दादा बंड करून पक्ष घेऊन पळाले त्या दिवशी पासून काकांना आपली जाणते पणाची स्व साक्षांकित पदवी मिरविणे असह्य झाले. अरे! येवढा कसा काय मी अडाणी ठरलो की मला असे काही घडेल याची पुसटशी कल्पना आली नाही? आणि त्या अजाणतेपणाची भावना काकांना अस्वस्थ करून गेली, असा शह राजकारणाच्या सारीपाटावर केवळ आपणच देऊ शकतो हा भ्रम क्षणात ध्वस्त झाला. परंतु, इतिहासातील अनेक सदृश पात्रांप्रमाणे काकांच्या देखील मनाची अवस्था झाली आणि ते दादाच्या ह्या खेळीला मात देण्यासाठी लगोलग कामाला लागले. जागोजागी सभा आयोजित करून जनसंपर्क करायचा, आपल्या तळागाळातील मतदार कार्यकर्ते ह्यांना भावनिक साद घालायची आणि पुन्हा एकदा मीच 'श्रेष्ठ ' हे सिद्ध करायचे असा बाणेदार हेतू घेऊन काकांची भरारी सुरू झाली. तिकडे काकांच्या ह्या पवित्र्यामुळे आता दादांचा खेळ खल्लास असे सगळ्यांना म्हणजे पत्रकारांना वाटत असतानाच दादांनी आपल्या वक्तव्यातून एक इशारा दिला की, तुम्ही विरोधी सूर लावून मला जनतेच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करणार असाल तर मला सुद्धा तशाच स्वरूपात उत्तर द्यावे लागेल आणि मग तुम्हाला आणखीनच क्लेश सहन करावा लागेल. आपले शस्त्र आपल्यावर बूमरॅंग होऊन प्रतिघात करू शकते हे वास्तव काही जाणत्या राजाच्या ध्यानी आले नाही ही वृद्धत्वाची किमया म्हणावी की झाकून ठेवलेल्या कोंबड्याने आपलं अस्तित्व उघडं पाडलं म्हणावं हे विचारणीय आहे.
असो सारांश असा की काकांनी उभ्या आयुष्यात केवळ आणि केवळ स्वार्थी राजकारण केले, जे काही अवती भवती पेरले तेच पिकले आणि त्या पद्धतीचे पीक काकांच्या पदरी पडले. दु:ख करावे असे कितीही वाटले तरी निसर्गाच्या न्यायालयात अपील नसते. फैसला एकदाच असतो आणि तो काकांच्या आयुष्यात या क्षणीं झालाय. 
कालच्या चुलत्या पुतण्याच्या भेटीचे सार हेच की पुतण्याने काकांची पुरती वाट लावली आहे, त्यांच्याच शैलीत धक्कातंत्र वापरण्याची हातोटी बेमालूमपणे साध्य केली आहे आणि तेल लावलेल्या पैलवानाला डायरेक्ट चीतपट केले आहे. 
 ह्या पुढे आणखी काही उपद्व्याप न करता शरपंजरी वर आसनस्थ झालेल्या ह्या आधुनिक भीष्माने आता उत्तरायणाची वाट बघावी हेच सयुक्तिक ठरेल.
रविंद्र सरदेशमुख 




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home