मोदी एक न उलगडणारं कोडं
जीवनाच्या सारिपाटावरील सोंगट्या नशीबाच्या हातात असतात अशी संभावित प्रथा आपल्याकडे आधीपासून प्रचलित आहे. एखाद्या कार्याला आपण वाहून घ्यावं, त्यात यशस्वी होण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करावेत पण कुठेतरी माशी शिंकली की सारं काही धुळीस मिळावं अशी स्थिती निर्माण झाली की नशीबाला दोष देऊन निवृत्त व्हावं ही मनुष्य स्वभावाची रीत आहे. परंतु नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या एका व्यक्तीला आपल्या बालपणातच एक अद्भुत मंत्र कुणाकडून कुणास ठाऊक पण मिळतो काय आणि ह्या बालकाने त्याला आपल्या आयुष्याचा परवलीचा शब्द बनवावा काय, सगळंच विलक्षण, अतर्क्य.
कुमार वयात येन केन प्रकारे शिक्षण आणि घर चालवण्यासाठी आपल्या पित्याला सहकार्य करताना काय धडपड करावी लागते ती शब्दाद्वारे व्यक्त करणं सोपं खचितच नाही त्या साठी जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे असेच म्हणावे लागेल. अशा सगळ्या अवघड परिस्थितीतून मार्ग क्रमण करीत असताना एके दिवशी रा स्व संघाच्या गुजरात प्रांतातील ज्येष्ठ प्रचारक आदरणीय लक्ष्मणराव इनामदार यांच्या दृष्टीस हा बालक पडतो आणि त्यांनी त्याला बाल स्वयंसेवक म्हणून संघकार्यात रुजू करून घ्यावे ही एक प्रकारे दैवी योजना असावी. नरेंद्र मोदींचा संघ प्रवास वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सुरू झाला हे वाक्य ऐकताच आपल्या पैकी अनेकांना आपलं बालपण आठवलं असेल हे उचितच आहे. आपल्या पैकी बहुतेकांनी लहानपणापासूनच संघ शाखेत जाणं आवडीने अंगिकारलेलं आहे आणि तो प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. असो, थोडं विषयांतर झालं पण ते क्रमप्राप्त होतं.
आपल्या मराठीत एक म्हण आहे कुंभाराचा घडा चाकावर असेस्तोवर जसा घडविलं जाईल तसा पुढे तो फुटेपर्यंत कायम राहतो. वरील उक्तिचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आजच्या घडीला भारतीय राजकारणात प्रभावी पणे कार्यरत असलेल्या अनेक नेत्यांकडे बघता येईल. अशाच नेतेमंडळींचा मेरुमणी आहे नरेंद्र मोदी. आपल्या संघ जीवनातील प्रत्येक दायित्वाला योग्य तो आयाम देणारा हा तरुण एक दिवस अचानक ऐहिक जीवन त्यागून तपश्चर्या करण्यासाठी प्रवृत्त होतो, अनेक वर्षे तप: साधना करून पुन्हा एकदा संघकार्यात सक्रिय होतो, प्रचारक म्हणून, भाजपचा संगठन मंत्री म्हणून आपल्या जीवनाला संघ आणि भाजप या दोन्ही समाजाभिमुख अशा परंतु स्वायत्त संस्थांशी निगडित राहू शकतो हे खरं संघटन कौशल्य आहे.
बारा वर्षे गुजरात राज्यातील शासन व्यवस्था मुख्यमंत्री पदावर राहून सांभाळताना त्यांनी ज्या अनोख्या कल्पना कार्यान्वित केल्या त्यांना एक निराळीच मान्यता जगभरातील सर्वच देशांमध्ये प्राप्त आहे. भारतात देखील गुजरात मॉडेल अशी संकल्पना प्रचलित झाली आणि आजही मान्यता मिळवून आहे. मोदींचं पंतप्रधान होणं हे सुद्धा असंख्य अडचणींवर मात केल्या नंतर साध्य झालं आहे, विशेष करून त्या काळातील सत्ताधारी पक्ष मोदी यांचं पंतप्रधान पदाकरीता नामांकन झालेलं बघून प्रचंड धास्तावला होता. त्यांच्यावर अनेक प्रकारे आरोप केले गेले, अन्याय पूर्ण कारवाया सुरू केल्या गेल्या, आणि विदेशी शक्तिंना हाताशी धरून त्यांना संपवण्याचा देखील प्रयत्न केला गेला. राजकारणात उंची गाठत आहे हे बघून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा देखील प्रयत्न केला गेला परंतु कुठल्याही क्षणी आपला तोल ढळू न देता हा स्वयंसेवक खंबीर राहिला. २०१६ मधील नोटा बंदी हा किती धाडसी निर्णय होता ह्याचं कथन त्यांनी त्यावेळी आपल्या भाषणातून केलं आहे, त्यांनी म्हटले आहे की ह्या निर्णयाचा परिणाम म्हणून मला जीव ही गमवावा लागणार आहे तरीही मी ही नोटा बंदी देश हितासाठी राबविणारच. पुढेही असे अनेक प्रसंग आहेत ज्या वेळी त्यांना ईश्वरी शक्तीची साथ मिळाली म्हणून ते आजही आपल्यात आहेत. देशांतर्गत हितशत्रू तर आहेतच पण परदेशात देखील ज्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेला नाचवायचे मनसुबे रचले जात आहेत ते तथाकथित डीप स्टेट वगैरे सारखे शत्रू सतत कार्यरत असतात.
अगदी अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी जी भाषणे केली आहेत त्यातून त्यांनी आपल्या मनातील भावना आणि देशापुढील आव्हाने अगदी सोप्या भाषेत सांगितली आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती भारता सारख्या विकासाच्या वाटेवर घोडदौड करणाऱ्या देशाला खीळ घालणारी आहे आणि अशा कठीण काळात समग्र भारतीय समुदायाने यांचं भान राखून व्यर्थ खर्च कमी करावेत अशा आशयाचं त्यांचं भाषण काही उपद्व्यापी पत्रकारांना सोयीचे वाटल्याने त्यांनी मोदी विरोध करताना देशहित धाब्यावर बसवले आहे.
स्वयंसेवक म्हणून आपण समाजात वावरताना काही अलिखित नियम आपण सतत पाळत आलो आहोत, समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेला राष्ट्रहित कशात आहे हे सोप्या सरळ भाषेत आपण सांगत असतो. थेट इमर्जन्सीच्या काळा पासून ते २०१४ साली, २०१६साली आणि अशा प्रत्येक दुर्धर प्रसंगी आपण आपल्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही. परवाच्या मोदींच्या हैदराबाद येथील भाषणाचा संदर्भ घेऊन मला जे काही कळलं त्याचा मतितार्थ असा आहे की येणाऱ्या काळात आपला समाजातील वावर अधिक प्रभावी आणि समाजाची दिशाभूल होण्यापासून रक्षणार्थ असावा.
रविंद्र सरदेशमुख

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home