Wednesday, 27 May 2026

सावरकर जयंती च्या निमित्ताने

आज जयंती च्या निमित्ताने विनम्र अभिवादन!
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण 
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार 
संत तुकोबारायांच्या ह्या ओळींना अंगिकारून मायभू साठी आपल्या सह संपूर्ण परिवाराच्या आहुती साठी बालपणीच उद्युक्त झालेल्या ह्या स्वातंत्र्य यज्ञातील स्फुल्लिंगाला आज आठवताना हृदयात अनेक भावनांचा उद्रेक होत आहे. सावरकरांचा चरित्र पट सरसर करीत डोळ्यांसमोरून धावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे ह्या महान धर्म रक्षकांच्या मांदियाळीत अचूक पिरवल्या गेलेल्या या रत्नावर केवळ धर्मद्वेष्ट्या इंग्रजी सत्तेविरुद्धच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हिंदुस्थानी काळ्या इंग्रजां विरुद्ध ही संघर्ष करावा लागला हा मोठाच दैवदुर्विलास आहे. 
आपल्या ध्येयाची दिशा वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी निश्चित करून देव-देश अन धर्मासाठी प्राण हाती घेऊन रक्तरंजित संघर्षात उडी घेणाऱ्या देशभक्तांच्या अद्वितीय कार्याची हेटाळणी करणारे कपाळकरंटे जेव्हा मान उंचावून समाजात वावरताना दिसतात तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती हीच की इंग्रज जरी येथून निघून गेले तरी आमच्या मधील गुलामी मानसिकता काही नष्ट झाली नाही. मुगल सत्ता काय किंवा इंग्रजी सत्ता काय दोन्ही अमानुष, क्रूर आणि हिंदुद्वेषी! त्यांच्या सत्तेविरुद्ध एखादी कुणकुण जरी लागली तरी शेकडोंच्या कत्तली करून दहशत निर्माण करणारी ही रक्त पिपासू जमात अवतीभवती असताना स्वातंत्र्य प्राप्ती चा ध्यास घेऊन अग्निदिव्य करणाऱ्या ह्या व्यक्तित्वांना अवतारी पुरुषच म्हणावे लागेल. मी आमच्यातली गुलामी मानसिकता नष्ट झाली नाही असे जे बोललो ते कां हे विशद करून सांगतो. स्वातंत्र्यवीर तात्यारावांचेच उदाहरण घेऊया. त्यांच्या प्रत्येक कृतीतून हेच दिसून येते की अन्याय आणि अत्याचाराला प्रत्युत्तर हे त्या अन्यायकर्त्यांच्याच पद्धतीने दिल्या गेले पाहिजे हा त्यांचा न्यायोचित आग्रह! आणि त्या कार्यात सिद्धता यावी, हमखास यश मिळावे यासाठी अतीशय पद्धतशीर आखणी करण्यातील त्यांची हातोटी. आपल्या शब्दांमधून क्रांतीयज्ञ सतत प्रज्वलित रहावा यासाठी त्यांनी योजीलेल्या अनेक क्लुप्त्या सर्वश्रुत आहेत आणि हे सगळे करण्याकरिता अंगिकारावी लागणारी प्रसंगी आक्रमक पण धर्ममान्य अशी आक्रमकता त्यांनी विलायतेत वास्तव्यास असल्याच्या काळात पुष्ट केली, आपल्या सोबत अनेक तरुण, वृद्धांना देखील इंग्लंडमध्ये राष्ट्रनिष्ठ बनविले आणि त्या काळात अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक धाडसी कृत्यांना सजीवत्व बहाल करून लाखोंच्या मनातील इंग्रजी सत्तेविषयीची भीती समाप्त केली. येथे आवर्जून म्हणावेच लागेल की पुढे भारतामध्ये जी प्रचंड मोठी चळवळ निर्माण होऊन इंग्रजांना पळ काढावा लागला त्याची संपूर्ण मांडणी ही सावरकरांच्या प्रेरणेने जनमानसात निर्माण झालेली इंग्रजी सततेविषयीची घृणा हेच प्रमुख कारण आहे. हिंदुंच्या मनांतील राष्ट्रभक्ती ही तात्कालिक कधीच नसते, तो स्वभावधर्म आहे, तशी जन्मतःच शिकवण मिळते. परंतु त्या राष्ट्रभक्तीला जागृत करावे लागते, अन्यथा ती घन निद्रेच्या अधीन असते आणि दैववादाच्या आहारी जाऊन बसलेली असते. सावरकरांनी जागृत केलेली हीच राष्ट्रभक्ती पुढे काही ढोंगी पुढाऱ्यांनी स्वतः ला मिळालेली देणगी समजून केवळ स्वार्थासाठी वापरली आणि स्वातंत्र्योत्तर काळात तीचा अमर्याद उपभोग घेतला.
बाबाराव काय,तात्याराव काय, किंवा नारायण राव काय हे तिघेही बंधु इंग्रजांच्या काळात आणि पुढील काळात कांग्रेसी सत्तेच्या कोपभाजनाचे कायम लक्ष्य राहिले. आज आपण बघतो आहोत अशीच काही हिंदुविरोधी नेते मंडळी आताशा उघडपणे हिंदुद्वेषाची आग ओकत आहेत आणि आमची गुलाम मानसिकता त्यावर व्यक्त होण्यासाठी सुद्धा तोंड लपवते. गेल्या काही वर्षांत सतत हिंदुंमध्ये जातीभेद निर्माण करून त्यांना विभक्त राहण्यासाठी प्रवृत्त करण्याचे अथक प्रयत्न करीत आहेत. सावरकरांनी जातिभेद नष्ट व्हावा, जाति द्वेष संपुष्टात यावा यासाठी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची उभारणी करून हिंदू एकतेचा पायंडा घालून दिला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे. 
अंती इतकेच म्हणायचे आहे की देशातील अंतर्गत किंवा बाह्य आव्हानांना ओळखून आपला राज्यशकट यशस्वी पणे चालत रहावा यासाठी आपणच स्वयंप्रेरणेने, शासनाकडून कुठलीही अपेक्षा न बाळगता शुद्धीकरणासाठी एकत्र यावे आणि घाण नष्ट करावी.
असे झाले तरच ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्ती साठी जीवन अर्पण करणाऱ्यांप्रती आपली निष्ठा ठरेल. अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्या उक्तीप्रमाणेच ठरेल.
स्वतंत्रतेला भगवती स्वरूप मानणाऱ्या विनायक दामोदर ऊर्फ तात्याराव सावरकर यांना समर्पित!
कवि 'रवि'
रविंद्र सरदेशमुख 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home