गांधी आणि त्यांचं छद्मी जीवन
गांधी नावाच्या छद्मी संताने भारतीयांना दाखविण्यासाठी तीन माकडे चिन्हीत केली होती जी लोकांना भ्रमित करून वास्तविकत: हे सांगायची की तुम्ही काहीही बघू नका, काहीही ऐकू नका आणि काहीही बोलू नका. आणि त्या काळातील भोळ्या भाबड्या भारतीयांना वाटायचं की ती माकडे त्या मदाऱ्याचा संतत्वाचा संदेश देताहेत की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलू नका. साबरमती नदी काठी वास्तव्य करून देखील ज्याने चित्त वृत्तिंना शुचिर्भूत केले नाही तो घृणित वृत्तिचा एक अघोषित हुकुमशहा होता.
कसा ते विशद करून सांगण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतो आहे.
मोहनदास करमचंद गांधी ह्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना प्रथमतः त्यांचं बालपण लक्षात घेतले पाहिजे. पोरबंदरच्या राजाचे दिवाण असलेले त्यांचे वडील, अर्थातच सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या ह्या मोहनाला तशी कशाचीही ददात नव्हती. त्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची जीवनशैली असणं स्वाभाविक होते. त्यामुळे श्रीमंत घराण्यातील जे काही चांगले वाईट संस्कार त्या वेळी असतील त्यांचा दृश्य परिणाम त्यांच्या उक्ती आणि कृती मधून दिसणारा होता.
साहजिकच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना विलायतेला जाणे क्रमप्राप्त होते. आधीपासून उच्चभ्रू वर्गातील असल्याने त्यांची इंग्रजांशी जवळीक होतीच, आणि त्यांच्या कल्चरचे आकर्षण मोहनाला होते हे उल्लेखित आहे.
बॅरिस्टर पदवी प्राप्त झालेल्या मोहनदास गांधी ला भारताविषयी कदापी आकर्षण नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या करियर साठी दक्षिण आफ्रिका हा देश निवडला. तेथे वकीली करीत असताना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांचा ते केंद्र बिंदू ठरले. पुढे चालून त्यांचे नेते ही बनले. येथे लक्षात घ्यायला हवे की हुकूमशाही पद्धतीने शासन करणाऱ्या इंग्रजांशी जवळीक असल्याने त्यांची नेतागिरी तेथे बहरली. करियरची साधारण २६ वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य करून असलेल्या माणसाला अचानक भारताविषयी अतोनात प्रेम जागृत व्हावे हीच मुळात अकल्पनीय बाब आहे. मग हे घडले कसे?
माझे आकलन असे आहे की मोहनदासाची वाढती लोकप्रियता तेथील राजकारणाला एक निराळी कलाटणी देऊ शकते अशी शंका जेंव्हा तेथील सरकारच्या मनात निर्माण झाली तेंव्हा त्यांनी गांधीचा विरोध करणं सुरू केलं. ह्यातून काही घटना घडल्या की गांधी तेथून निघून जावे असा प्रयत्न केला गेला. ब्रिटिश राजवटीला गांधी विषयी आणि गांधी ला इंग्रजांविषयी विशेष प्रेम होतेच. त्यावेळी धूर्त इंग्रजांनी गांधी ला भारतामध्ये आपला हस्तक म्हणून आयात करण्याचा धूर्त निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने पावले उचलली. इंग्रजी भाषा, इंग्रजी सोसायटी आणि त्यांच्या प्रभावाखाली जगण्याची सवय असलेल्या गांधी ला हे आमंत्रण पर्वणी ठरले. सुरुवातीला गांधी भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या उपस्थितीची जनसामान्यांनी दखल घ्यावी म्हणून ज्या युक्त्या क्लुप्त्या वापरल्या त्या अगदी ठरवून केलेल्या आहेत हे अभ्यासाअंती सिद्ध करणे सहज शक्य आहे.
पुढील जीवन गांधी यांनी महात्मा गांधी म्हणवून घेत जगण्याची स्वतः ला अशी काही सवय लावली की ते स्वतःला भारतीय जनतेचा एकमेव तारणहार मानू लागले आणि जनताही त्यांना संत मानू लागली. मी येथे अवश्य नमूद करू इच्छितो की भोळ्या भाबड्या भारतीय जनतेला कोण्या एकात देव दिसला की त्यांचं मतपरिवर्तन करणं अजिबात शक्य नाही. त्यात इंग्रजांचा वरदहस्त लाभलेला हा साबरमती चा संत पुढे भारताचा अनभिषिक्त हुकूमशहा बनला आणि तत्कालीन इतर भारतीय सुसंस्कृत आणि देशप्रेमी नेत्यांचं खच्चीकरण हेतुपूर्वक करू लागला. काय ते सत्याग्रह, काय ते उपोषण आणि सूत कातणे वगैरे सगळं काही अतर्क्य!
शूरवीरांच्या ह्या धरतीवर हे असले थोतांड वादी व्यक्तिमत्त्व इंग्रजांनी खूप मनापासून पोसले. गांधी चा इगो जोपासायचा आणि त्या करवी येथील स्वातंत्र्य वादी चळवळीला सुरूंग लावायचा हा धूर्तपणा गांधी ला कधीच लक्षात आला नाही असे असू शकते काय? पण स्वतःच गुंफलेल्या कोषाची हाव कधी गांधी ला अंतर्मुख होऊ देणार नव्हती. फोडा आणि राज्य करा हे ब्रीद असलेल्या महा कपटी इंग्रजांनी गांधीचा फुगा कधीच फुटू दिला नाही. फोडाफोडी ला खतपाणी घालता घालता जाती जातीं पलिकडे जाऊन इंग्रजांनी हिंदू मुस्लिम विवाद जिन्ना आणि नेहरू च्या खांद्यावर बंदूक ठेवून चिघळवला आणि देश विभाजन घडवून आणले ते गांधींच्या डोळ्यासमोर. लाखो लोकांच्या कत्तली, लाखोंच्या स्थावर जंगम मालमत्तेची राखरांगोळी, अनगिनत आया बहिणींची अब्रू तसेच आबालवृद्धांची झालेली वाताहत ह्या आंधळ्या मुक्या बहिऱ्या सोंग्या ढोंग्या तरीही ह्या देशातील जनतेला संत स्वरूप वाटणाऱ्या गांधी नावाच्या भेकडाला कधीच दिसल्या नाहीत.
भारतात शरणार्थी म्हणून पळून आलेल्या हिंदुंना गांधी चा आदेश होता की त्यांनी पाकिस्तानात परत जावे, त्यांनी तिथेच मरावे. आणि ह्या आदेशाची पूर्ती व्हावी यासाठी त्यांना शरणार्थी कॅम्प सुद्धा मिळू नयेत ह्यासाठी गांधी आपलं वजन वापरण्यात मग्न होते.
गांधी ला मारण्याचा विचार काय एकटा नाथूराम करीत होता काय? त्याकाळातील सर्व जाणत्यांना गांधी चं अस्तित्व नको होतं. त्या विचारांना अंमलात आणण्यासाठी नाथूराम प्रवृत्त झाला, एवढेच.
सोईचे राजकारण करण्याची गुरुकिल्ली गांधी ने कांग्रेस ला वरदान म्हणून दिली आणि ती सर्रास वापरता यावी म्हणून स्वतः चे नावही दिले. हाता तोंडाशी गाठ असलेल्या भारतातील गरीब जनतेला दिलासा देऊ शकेल असे वातावरण निर्माण केले जाऊ शकले नाही हे ही एक अत्यंत दुर्दैवी सत्य आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं ठरवताना आम्हाला गत इतिहासातची सत्यता समजून घ्यावी लागेल, अशा सर्व कुमान्यतांना मूठमाती देऊन एक बलशाली, सुसंस्कृत आणि परम आदरणीय भारत निर्माण करावा लागेल.
कवि 'रवि'
