मित्रांनो जय श्रीराम
उत्क्रांती वादाच्या पार्श्वभूमीवर माणूस निरनिराळ्या अवस्था पार करत करत आज इथपर्यंत पोचला आहे की आता दाराच्या आत चप्पल निराळी असते बाहेर पडताना वॉकिंग शूज, कॅजुअल शूज, फॉर्मल शूज, स्नीकर, सॅंडल, लोफर आणि काय काय असंख्य प्रकार उपजले आहेत. अनवाणी पायांनी धावून स्वर्ण पदक मिळवणारा मिल्खासिंग सुद्धा स्पोर्ट्स शूज ची जाहिरात करताना बघून आजच्या पिढीला धन्यता वाटते. पायात रुतणारा 'काटा' असा शब्द आता जपानी भाषेतला आहे असं समजून मुलं त्याचा अर्थ गुगल वर शोधताना दिसतात.
आपण हे जे काही जगलो आहोत ते आता कपोलकल्पित ठरत आहे.
टेकसॅव्ही आणि गॅजेटसॅव्ही आधुनिक पिढीला काही करण्यासाठी डिजिटल असिस्टंट सतत मदत करीत असतात.
डार्विन जर आज पुन्हा जन्माला आलाच तर तो ह्या पृथ्वीला ओळखणार ही नाही आणि यदाकदाचित ओळखलंच तर उत्क्रांती वादाचा लेखक मीच होतो हे कुणालाच कळू नये यासाठी ईश्वराची आळवणी करीत बसेल.
शंभर वर्षांत जग इतकं बदललं आहे पुढील शंभर वर्षांत काय होणार आहे हे कल्पनेलाही कल्पना करता येत नाही.
असो!
बालपणीच्या आठवणींनी तार छेडली, त्या तरंगांना प्रतिसाद म्हणून ही प्रतिक्रिया उमटली आहे.
काल बरा होता की आज बरा आहे किंवा उद्या बरा असेल हे काळच ठरवणार आहे.
कालाय तस्मै नमः 🙏
कवि 'रवि'