Sunday, 30 April 2023

आजच्या महाराष्ट्र दिनी....

दिनांक १ मे १९६०
महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तो दिवस
तशा अनेक आठवणी आहेत ह्या दिवसाच्या
परंतु प्राथमिकतेवर काय घडले ते पाहुया
मुंबई राज्य ही व्यवस्था संपुष्टात आली. गुजरात राज्य नव्याने अस्तित्वात आले.
सी पी ऍड बेरार प्रॉव्हिंस ही प्रांत व्यवस्था संपुष्टात आली आणि विदर्भ महाराष्ट्रात अंतर्भूत झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील १०५ आंदोलकांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या रक्ताचा पाट अजूनही मराठी माणसाचे मन रक्ताळून जातो. 
राज्य व्यवस्था बदलण्यासाठी जे काही निकष लावले गेलेत, ते कितपत यशस्वी झालेत ह्याची केंद्रातील तत्कालीन किंवा त्या नंतरच्या काळातील सरकारांनी कधी मिमांसा केली असे भासतही नाही. 
महाराष्ट्र दिन आपण साजरा करण्यात असे अप्रूप ते काय ह्याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून गंभीर पणे करायलाच हवा. 
राजकारणाच्या खेळात सारीपाट आणि त्या वरील सोंगट्या मन मर्जीने फिरवण्याच्या काळाला शेवटचा रामराम करून एक सुदृढ सुसज्ज सर्वांगीण विकासाने युक्त असे महाराष्ट्र राज्य पुढील पिढ्यांना देणं ही आजच्या अस्तित्वात असलेल्या पिढ्यांची जबाबदारी आहे, आणि आपल्या हयातीत हे आपण घडवून आणण्यासाठी कटिबद्ध होऊयात. 
तेंव्हाच महाराष्ट्र दिन साजरा करण्यात कृतकृत्यतेचं समाधान मानता येईल.
जय महाराष्ट्र
रविंद्र सरदेशमुख
१/५/२०२३

Saturday, 29 April 2023

एक रात की नज़र में

एक रात की नजर में
तन्हां ही सा सफ़र है
आगोश में है हसरतें
वीरानी का असर है

मैं काटता हूं लम्हें
एक और आस लेकर
मंजिल दगा न देगी
कुछ चाह में कसर है

राहे वफ़ा का आखिर
'रवि' अंजाम बेवफाई
इस दिल की दास्तां में
ख़ामोशी ही बसर है

कवि 'रवि'

पहाट

रंगछटांची उधळण करुनी पहाट आली
थव्या थव्याने पक्षांची रांगोळी निघाली
नभ ते किंचित निळ्यास टिळे लाविते झाले
मधेच सुळके संचारांचे दिसते झाले
पुष्पे खाली धरणी वरती सडा शिंपिती
दूर मंदिरी भूपाळीचे स्वर मधुर गुंजती
कुठे कुणा तान्हुल्यास माता दुग्धे भरिते
समयी अशा 'रवि' तुज ही बघ कविता स्फुरते
सृष्टी नियंत्या तुझ्या लीलांचा तूच विधाता
आम्ही पामरे थकतो ना कधी तव गुण गाता
कवि 'रवि'

समांतर

त्याची आणि तिची "ही" नवखीच रात्र होती
दशकांतरी जरी कां समवेत गात्रं होती
धृव गोल ते, जणू की, मिळणार ना कधीही
प्रेमात त्याज्य सारे, ही जाण मात्र होती
असती जरी किनारे, दोघांस साथ देती
जननांतुनी प्रकटली ती सर्व पात्रं होती 
एकास एक न कळे, तरीही घनिष्टता ती
भय झाकिती मनाचे, दुसऱ्यास धीर देती
"परिवार" हा 'रवि' कां, धोका असे मनाचा
"नाती"च दु:ख देती, तरीही हवी हवी ती
कवि 'रवि'

Thursday, 27 April 2023

अंधारले क्षण

एका क्षणात विरल्या जव त्या सुवर्ण रेखा
'अंधारल्या क्षणांना' तो सूर्य साक्षी होता 

'आभाळ' ते क्षणाचे, जगणे तसे यकश्चित 
 झाकोळण्या धरित्री तरीही प्रमाद होता 

तो एक ध्येय वेडा, ध्येयासी पार नाही
आकाश कल्पनांचे कवट्यात घेत होता 

चिरदाह चांदण्यांचा मजसी तसा सुखावे
स्वर मात्र हुंदक्यांचा हृदयात तप्त होता 

कुठुनी कसा 'रवि' तू साकारला जमाना 
'अंधार पाखरांना' अधिकार देत होता 

कवि 'रवि'

Wednesday, 26 April 2023

कुंपण

कशा कशाचं भावतं मनाला कुंपण
विचारांचं
नात्यांचं
भावनांचं
समूहाचं
जातीचं
धर्माचं
प्रांताचं
देशाचं
कुंपणंच कुंपण
आवरणंच आवरणं

दडलेलं मन मग
आर्ततेनं कण्हतं

कुंपणा बाहेरची कुंपणं परंतु
सारखीच असतात बधीर 

त्यांच्याही कण्हण्याचा तरंग 
कुंपणा बाहेर पडत नाही

जीवाची शिवाकडे
सुरू होते वाटचाल
कुंपणाची विण मात्र
सुटता सुटत नाही
कुंपणाची विण मात्र......सुटता सुटत नाही.
कवि 'रवि'

Tuesday, 18 April 2023

योजने जरी पार गेलो

योजने जरी पार गेलो
वेदनेला त्यागुनी
मौक्तिकांच्या त्या सरी
ढळती का नयनांतुनी

क्षण आठवांचे उसळती
दडपू जरी का पाहतो
कोसळे अवसान सारे
वज्र सम हृदयातुनी

ते तुझे स्वातंत्र्य आहे
तू तुला कोठे पहावे
मीच मग अजुनी कसा
नच मुक्त त्या पिंजऱ्यातुनी

एक सर वळीवाची येई
अन् मना वितळून जाई
ये पुन्हा तू एकदा ये
ये आर्त स्वर धमन्यांतुनी
कवि 'रवि'

Monday, 17 April 2023

सामाजिक समरसता:- व्याख्या आणि प्रवास

मित्रांनो, 
अनादि काळापासून सनातन संस्कृती अस्तित्वात आहे आणि तिच्या शाश्वततेच्या स्वभावगत लक्षणामुळे ती अनंत काळापर्यंत अबाधित राहील यात शंका नाही.
आता आपण "सामाजिक समरसता" ह्या विशेषण युक्त विषयाची नेमकी व्याख्या काय ह्याचा विचार करुयात.
ह्या विषयावर काही लिखाण सुरू करण्यापूर्वीच मी वर सनातन संस्कृती चा उल्लेख केला तो कां हे आपल्या लक्षात येईल.
मित्रांनो सनातन संस्कृती च्या सामाजिक रचनेप्रमाणे ती व्यवसायाभिमुख आणि विनिमय पद्धतीने प्रचलन करणारी होती. जो पर्यंत हा विनिमय वस्तूंच्या आदानप्रदानावर आधारित होता तो पर्यंत वर्णव्यवस्था कायम होती आणि जाति व्यवस्थेचा उगम झालेला नव्हता. म्हणजेच काय तर जो तो आपापल्या व्यवसायात रममाण होता आणि त्याचे समन्वयन देखील उत्तम रीतीने अस्तित्वात होते. 
मित्रांनो ह्या व्यवस्थेचा मूळ उद्देशच असा होता की समाजातील प्रत्येक घटकाला एकमेकाची गरज असावी आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारची स्पर्धा निर्माण न होता समाज जीवन सुचारू रहावे. आणि ह्या वर्तनाला आजच्या भाषेत आपण सामाजिक समरसता असे संबोधले आहे.
"उच्च नीचतेचा नि:पात आणि व्यवसायाभिमुख समाज जीवन" हीच सामाजिक समरसतेची व्याख्या ठरू शकते.
मग ही आदर्श व्यवस्था कां म्हणून लयास गेली? 
त्याचा उहापोह आपण यापुढे करणार आहोत. 
सनातन भारताचा व्याप हा जवळपास संपूर्ण आशिया खंडात पसरलेला होता आणि त्या अनुषंगाने मोठा व्यापार देखील होत होता. समृद्ध जीवन असल्याने दैनंदिन गरजां पलिकडे जाऊन आवड निवड आणि त्या अनुषंगाने विविध वस्तूंची खरेदी तसेच विक्री प्रांता प्रांतात सुरू झाली आणि येथपासून विनिमय पद्धती मध्ये बदल घडून येण्याची निकड निर्माण झाली. 
लक्षात घेण्यासारखे आहे की त्या काळी मौल्यवान वस्तू जसे की सोनं चांदी तांबे आणि विविध रत्ने ही विनिमया करिता पर्याय म्हणून उपयोगात आली.
या प्रकारच्या व्यवहारात अडचण अशी होती की जो तो आपापल्या परीने वस्तूंचे मूल्य निर्धारण करू लागला आणि त्यामुळे व्यवहार एक अर्थी अनियमिततेच्या विळख्यात सापडले जात. 
पर्यायी व्यवस्था म्हणून पुढील काळात सुवर्ण मुद्रा, चांदीच्या मुद्रा आणि तांब्याच्या मुद्रा चलन म्हणून अस्तित्वात आले आणि व्यापार व्यवस्थापन नियमित झाले तसेच त्यामुळे व्यापार उदीम भरभराटीला लागला आणि समाज व्यवस्था देखील प्रभावित झाली. हळूहळू प्रांता नुसार चलनी नाणी घडविल्या जावून विविध देश प्रदेश आपल्या प्रांतात निर्मित वस्तूंचे मूल्य निर्धारण स्वतः करू लागली, आणि त्या अनुषंगाने एक प्रकारची स्पर्धा तसेच वर्चस्व निर्माण करण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. 
सहस्त्रावधी वर्षांची व्यवस्था ह्या विनिमय क्रांतीने लोप पावली आणि व्यापारी वृत्तीला प्रचंड बळ प्राप्त झाले. ह्या मुळे समाजव्यवस्था सुद्धा मोडकळीस आली आणि जागोजागी नवश्रीमंत उदयास आले, त्यांनी आपल्या श्रीमंतीच्या जोरावर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले, त्यातून स्पृश्य अस्पृश्य असा भेदाभेद जन्माला आला. ही विषवल्ली इतकी फोफावली की शतकांच्या प्रयत्नांनंतर ही ती आजही आमच्या अवतीभवती अस्तित्वात आहे, व प्रखरतेने त्याचा प्रभाव निदर्शनास येतो. 
मित्रहो, छत्रपती शिवरायांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे सर्व प्रथम ह्या स्पृश्यास्पृश्यतेला आळा घालण्यासाठी सुरुवात झाली.
छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा इतिहास अभ्यासताना हे प्रकर्षाने जाणवते की त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय आणि प्रबोधन करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांचा हा वारसा पुढे महाराष्ट्रातील प्रबुद्ध जनांनी निरनिराळ्या प्रकारे केवळ जपलाच नाही तर त्याला अर्थात सामाजिक समरसतेला मूर्त स्वरूपात मान्यता प्राप्त व्हावी यासाठी वेळोवेळी आंदोलने देखील केलीत. 
पारतंत्र्याच्या साधारण सहाशे वर्षांच्या कालावधीत अशा अनेक संत महात्म्यांना किंवा समाज सुधारकांना स्वार्थांध शक्तिंनी पुरजोर विरोध केला. प्रसंगी त्यांच्या हत्या देखील घडवून आणल्या आहेत. शासनकर्ती जमात त्यांच्या प्रांतातील लोकांना आपल्या अधीन राखण्यासाठी वैध अवैध सर्व प्रकारच्या कृतींचा अवलंब करीत होती. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयोग अंमलात आणले जात होते.
त्यातूनच जाती जातीं चं विषारी राजकारण जोर धरू लागलं.
आजपावेतो आपण जातिभेद, धर्मभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढतो आहोत हीच खरी विभीषिका (भयंकर बाब)आहे.
मित्रांनो, आज काळ बदलला आहे, जगभरातील समाजव्यवस्था एका नवीन रचनेचा अनुभव करीत आहे ज्यात जातिभेद किंवा वर्णभेद लयास जाऊन एक नवीनच समाज व्यवस्था उदयास येत आहे. केवळ पाश्चिमात्य देशांमधूनच नाही तर भारतीय उपखंडात देखील ह्याची प्रचिती येत आहे. 
परंतु असे असूनही आपल्या सभोवती आपण सामाजिक विषमता आहे हे अमान्य करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. 
अशा ह्या वातावरणात "सामाजिक समरसता" हा विषय घेऊन त्यावर समाजाच्या सर्व स्तरात मोठ्या प्रमाणात विचार मंथन आणि त्या अनुषंगाने सकारात्मक बदल घडून येणे अत्यावश्यक आहे. 
"वसुधैव कुटुंबकम्" ही आपली प्राचीन संकल्पना पुन्हा पुनरुज्जीवित होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने एक समान जीवन पद्धती आत्मसात करणे ठरेल. आणि यातूनच अवघे विश्व पुन्हा एकदा सामाजिक समरसतेला अनुभूत असे विलक्षण जीवन जगण्यासाठी प्रवृत्त होईल.
रविंद्र सरदेशमुख.

Sunday, 16 April 2023

स्तब्ध

स्तब्ध झाली दृष्टीही अन स्तब्ध झाला श्वासही
कां तरी पण विद्ध मन हे सोडिना ती आस ही

ध्येय जगण्याचे कसे ते पूर्ण मम झाले नसे
वंचना आक्रोशितांना कां असावी खास ही


एक तो वेडा दिसे मज मी तयाला ही तसा
वेदना संवेदना जड शून्य भासे भास ही 

कां कधी संपेल हा खेळ अंधारासवे चा 
दग्ध तन मन दग्ध जीवन इतुका नसावा त्रास ही 


रात्र निद्रेला मुकावी दिन तमाच्या अंतरी
राख स्वप्नांची उडावी संपून जावी रास ही

उसळती ज्वाळा चितेच्या रूप झाले राख ते 
कां तरी मजला कळेना कां अनामित प्यास ही 
कवि 'रवि'